Loksabha 2019 : माढातून राष्ट्रवादीतर्फे संजय शिंदे

Sanjay-Jagjitsinh
Sanjay-Jagjitsinh

बारामती - राज्याचे लक्ष असलेल्या माढा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांना उमेदवारी जाहीर केली. 

जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला. त्यानंतर तेच माढ्यातून उमेदवार असतील, अशी घोषणा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली. त्याचबरोबर उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातून राणा जगजितसिंह पाटील यांच्या नावाची घोषणा केली.

‘यंदाची लोकसभेची निवडणूक ही अत्यंत महत्त्वाची आहे. देश एका वेगळ्या स्थितीतून जात आहे. त्यामुळे शेतकरी व सामान्यांचा विचार करणाऱ्या काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मागे मतदारांनी उभे राहावे,’ असे आवाहन पवार यांनी या वेळी केले. ‘‘मला जितक्‍या मताधिक्‍याने निवडून दिले होते; त्यापेक्षा अधिक मताधिक्‍याने संजय शिंदे यांना निवडून द्या,’’ असे आवाहन पवार यांनी केले.

या प्रसंगी बोलताना संजय शिंदे यांनी, ‘‘मी राष्ट्रवादीत प्रवेश केला, असे म्हणणे चुकीचे आहे. मी तुमच्याच विचारांचा होतो आणि आजही आहे,’’ असे नमूद केले. मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये केवळ पवारसाहेबांच्या प्रेमापोटी आलेलो आहे, असे सांगत त्यांनी मोहिते पाटील कुटुंबीयांवर नाव न घेता टीका केली.

संजय शिंदे यांच्या पक्षप्रवेशानंतर पत्रकार परिषदेत पवार यांनी भाजपवर टीका केली. ते म्हणाले, ‘‘देशात राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) सरकार येईल, असे आजतरी मला वाटत नाही. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, राजस्थान या राज्यांत भाजपच्या जागा कमी होण्याची दाट शक्‍यता आहे. तेथे काँग्रेसच्या जागा वाढतील. याशिवाय पश्‍चिम बंगाल व इतर राज्यांत एनडीएची पीछेहाट होईल.’’ 

‘मोदींच्या हातातील सत्ता काढून घेण्यासाठी मला जे काही करता येईल ते मी करणार आहे, असे राज ठाकरे यांनी मला भेटीदरम्यान सांगितले आहे. त्यांच्याशी माझी सविस्तर चर्चा झाली आहे. भाजप व त्यांच्या मित्रपक्षांना सत्तेवर येण्यापासून रोखण्याचे काम राज ठाकरे करणार आहेत.

गुढीपाडव्याच्या त्यांच्या मेळाव्यात ते याबाबतची सविस्तर भूमिका जाहीर करणार आहेत.’’

‘‘ज्यांनी विधानसभेची एकही निवडणूक लढविली नाही, ज्यांना लोकांच्यातून निवडून जाण्याचा यत्किंचितही अनुभव नाही; असे लोक महाराष्ट्राला मार्गदर्शन करतात. त्यांना किती गांभीर्याने घ्यायचे, हे तुम्हीच ठरवा,’’ असे माध्यमांना सांगत पवार यांनी चंद्रकांत पाटील यांची खिल्ली उडविली.

‘अनसेफ’ जागांवरच नवीन चेहरे
‘‘ज्या जागा निवडून येण्याच्या दृष्टीने सेफ आहेत, तेथे आम्ही काहीही नवीन प्रयोग केलेला नाही. मात्र, मावळसारख्या जागेवर गेल्या तीन निवडणुकांत आम्हाला यश मिळाले नाही. त्यामुळे तेथे एखादा युवक देऊन आम्ही प्रयोग करण्याचा निर्णय घेतला आहे. जो मावळमध्ये निर्णय घेतला तो माढ्यात घेतला नाही. तेथे संजय शिंदे यांना आम्ही उमेदवारी दिली आहे. नवीन चेहऱ्यांवर रिस्क घेणे कधीही फायद्याचे असते, या न्यायानेच पार्थ पवारांना उमेदवारी दिली आहे,’’ असे पवार यांनी सांगितले.

आधी ठेचा...
पार्थ पवार यांना भाषणावरून ‘ट्रोल’ केले, याबाबत पार्थ यांना काय सल्ला द्याल, असे विचारता, ‘‘काहीही सल्ला देणार नाही. नवीन कार्यकर्त्यांना ठेचा लागतात आणि नंतर त्यांची पावले योग्य दिशेने चालतात,’’ असे ते म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com