Loksabha 2019 : मराठा क्रांती मोर्चाचा पाठिंबा कोणत्याही पक्षाला नाही

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 25 मार्च 2019

मराठा क्रांती मोर्चाचा कुठल्याही पक्षाला पाठिंबा नसेल, असे स्पष्ट करीत मोर्चासाठी परिश्रम घेणारा कुणी समाजबांधव निवडणुकीत अपक्ष उभा असल्यास त्याच्या मागे उभे राहा, असे आवाहन येथे करण्यात आले. अन्य कोणत्याही मोर्चाचा क्रांती मोर्चाशी संबंध नाही, असेही या वेळी स्पष्ट करण्यात आले.

औरंगाबाद - मराठा क्रांती मोर्चाचा कुठल्याही पक्षाला पाठिंबा नसेल, असे स्पष्ट करीत मोर्चासाठी परिश्रम घेणारा कुणी समाजबांधव निवडणुकीत अपक्ष उभा असल्यास त्याच्या मागे उभे राहा, असे आवाहन येथे करण्यात आले. अन्य कोणत्याही मोर्चाचा क्रांती मोर्चाशी संबंध नाही, असेही या वेळी स्पष्ट करण्यात आले.

आगामी निवडणुकीत क्रांती मोर्चाची भूमिका काय असावी, याबाबत चर्चा करून निर्णय घेण्यासाठी रविवारी (ता. २४) येथे बैठक झाली. या वेळी उपस्थितांनी मते मांडली. कुठल्याही पक्षाने समाजाचे प्रश्‍न सुटावेत, यासाठी प्रयत्न केले नाहीत. मोर्चात समाज म्हणूनच विविध पक्षांच्या पदाधिकारी, नेत्यांनी सहभाग नोंदविला; मात्र प्रश्‍न सुटले नाहीत. ही लाजिरवाणी बाब आहे, अशी खंत समन्वयकांनी मांडली.

मोर्चाचा कुणीही वैयक्‍तिक स्वार्थासाठी वापर करू नये, समाजाच्या प्रश्‍नांची दाहकता सरकारला कळावी म्हणून अनेकांनी बलिदान दिले. बलिदान दिलेल्या बांधवांच्या कुटुंबाला सरकारकडून मदत मिळाली का, असा प्रश्‍न विचारला तर त्याचे उत्तर नाही असेच आहे. त्यामुळे कुठल्याही राजकीय पक्षाला, संघटनेला, उमेदवाराला मराठा क्रांती मोर्चाचा पाठिंबा नसेल. 

समाजाला गृहीत धरू नये 
क्रांती मोर्चाच्या नावावर कुणीही कुठल्याही राजकीय पक्षाकडून आर्थिक मदत मागता कामा नये. जर असे कृत्य समोर आल्यास समाजाने त्याच्यावर बहिष्कार टाकण्याची तयारी ठेवावी. निवडणुकीचे वातावरण रंगत आहे. या काळात अनेक पक्ष, संघटना खिसे गरम करून घेण्यासाठी राजकीय पक्षांच्या दारात जातात. त्यामुळे कुठल्याही पक्षाने, नेत्यांनी समाजाला गृहीत धरू नये आणि पैशाने विकत घेण्याचा प्रयत्नही करू नये, असा निर्णयही या वेळी घेण्यात आला.

Web Title: Loksabha Election 2019 Maratha Kranti Morcha Support Political Party politics