Loksabha 2019 : ‘मोदी-शहांच्या पराभवासाठी मैदानात’ - बाळा नांदगावकर

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 21 एप्रिल 2019

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यापासून भारताला धोका आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना मैदानात उतरली आहे, असे ‘मनसे’चे नेते बाळा नांदगावकर यांनी ‘सकाळ’चे प्रतिनिधी प्रशांत बारसिंग यांच्याशी बोलताना सांगितले. या मुलाखतीचा अंश...

आमची भूमिका - महाराष्ट्र नवनिर्माण सेना
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यापासून भारताला धोका आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना मैदानात उतरली आहे, असे ‘मनसे’चे नेते बाळा नांदगावकर यांनी ‘सकाळ’चे प्रतिनिधी प्रशांत बारसिंग यांच्याशी बोलताना सांगितले. या मुलाखतीचा अंश...

प्रश्‍न - नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या कारभाराबद्दल आपण काय सांगाल?
नांदगावकर -
 मोदी-शहा यांच्या एकूणच कारभाराने देश संकटात आलाय. सध्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात जीएसटी, नोटाबंदी, काळा पैसा असे विषय बाजूला पडलेत. बेरोजगारी वाढली. छोटे उद्योग बंद पडलेत. फसलेल्या नोटाबंदीवर सत्ताधारी बोलत नाहीत. केवळ धार्मिक बाबी, भारत-पाक संबंध आणि सर्जिकल स्ट्राइक, या मुद्द्यांवर प्रचार करताहेत. त्यामुळे स्वत:च्या पक्षाचा वा पक्षाच्या नेत्यांचा फायदा-तोटा न पाहता केवळ जनतेला सावध करण्यासाठी ‘मनसे’चे प्रमुख राज ठाकरे पोटतिडकीने वास्तववादी चित्र मांडत आहेत. त्यांच्यासारख्या दूरदर्शी नेत्याचे विचार पटायला वेळ लागतोय, तरी ते निश्‍चितच पटतील.

प्रश्‍न - मोदी-शहा यांच्यावर राग का?
- देशभरातील जनतेचा मोदींकडून भ्रमनिरास झालाय. गुजरात दौऱ्यानंतर मुख्यमंत्रिपदावरील मोदी पंतप्रधानपदी गेल्यास बदल घडेल, असे राज यांनीच सांगितले होते. मात्र, त्यानंतर हा माणूस पूर्णपणे बदलल्याचे त्यांना जाणवले. जीएसटी, नोटाबंदीसारख्या धोरणांमुळे बेरोजगारी वाढली. मोदींची विकासाची भाषाच बंद झाली. मोदींनी जनतेची 
फसवणूक केली.

प्रश्‍न - राज यांच्या आवाहनाला मतदार प्रतिसाद देतील?
- राजकीय पक्षाची स्वतंत्र विचारधारा असते; तशीच ती ‘मनसे’च्या मतदारांचीही आहे. शिवसेना आणि भाजपचे मतदार तसेच कार्यकर्ते त्यांच्या मनात नसतानाही अनेक ठिकाणी एकमेकांच्या उमेदवारांना मतदान करणार आहेत. इथे तर ‘सत्य विरुद्ध असत्य’ अशीच लढाई आहे. असत्य बोलणारे, जनतेला गृहीत धरणारे तसेच समाजाच्या विकासाच्या नावाखाली केवळ पक्षाचा विकास करणाऱ्यांपासून जनतेने सावध राहावे, यासाठीच राज ठाकरे प्रामाणिकपणे प्रयत्न करीत आहेत. ‘डिजिटल इंडिया’अंतर्गत हरिसाल पहिले डिजिटल गाव घोषित करण्यात आले. येथे मी, माझे सहकारी गेलो. तिथे सर्व व्यवहार अजूनही रोखीतच सुरू आहेत. हीच सर्व फसवेगिरी राज सभेत 
पुराव्यासहित दाखवताहेत.

प्रश्‍न - मनसे पुन्हा उभारी घेईल?
- १९७८ मध्ये शरद पवार यांच्या नेतृत्वात ५० आमदार निवडून आले; त्यातील ४५ आमदार सोडून गेले. छगन भुजबळ शिवसेनेतून बाहेर पडले तेव्हा त्यांच्यासोबतही आमदार बाहेर पडले. मात्र, नंतर त्यांचे काय होते, हेदेखील आपण पाहिले. राज प्रामाणिकपणे जनतेची लढाई लढत आहेत. मनसे कात टाकत आहे. विधानसभा निवडणुकीनंतर पक्षाचा आलेख 
उंचावलेलाच दिसेल.

प्रश्‍न - भविष्यात राज-उद्धव एकत्र येतील?
- २०१४ च्या विधानसभा निवडणुकीवेळी भाजपने शिवसेनेसोबत युती तोडल्यानंतर २३ सप्टेंबर रोजी उद्धव ठाकरे यांनी राजसाहेबांना फोन केला. उद्धव साहेब म्हणाले की, काहीतरी विचार करावा लागेल. २४ सप्टेंबर रोजी सुभाष देशमुख आणि बाजीराव दांगट राजसाहेबांच्या घरी आले. दोन बंधूंनी एकत्र यावे, असे ते म्हणाले. मग राजसाहेबांनी उद्धवसाहेबांना फोन केला. एकत्र येण्यासाठी चर्चेचे अधिकार बाळा नांदगावकरांना देतो, असे राज यांनी सांगितल्यावर उद्धव ठाकरेंनी अनिल देसाईंना अधिकार दिले. मात्र, अर्ज भरण्याच्या २७ सप्टेंबर या शेवटच्या तारखेपर्यंत एकत्र येण्याबाबत काहीही झाले नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे ‘लीलावती’मध्ये उपचारासाठी दाखल असताना मी त्यांना राज आणि उद्धव या दोन्ही भावांना एकत्रित आणण्याचा शब्द दिला होता. ते एकत्रित आले असते, तर खूप आनंद झाला असता. पण, दुर्दैवाने मला अपयश आले. याबाबत त्या दोघांनीच निर्णय घ्यायचाय.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loksabha Election 2019 MNS Bala Nandgaonkar Narendra Modi Amit Shah Politics