Loksabha 2019 : मुंबईत ‘मनसे’चा आघाडीला आधार

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 13 एप्रिल 2019

मुंबईतल्या सर्वच लढती रंगतदार
उत्तर मुंबईत मनसेची ताकद मराठमोळ्या ऊर्मिला मातोंडकराच्या मागे उभी राहिली आहे. तर ईशान्य मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय दीना पाटील यांच्यासोबत मनसे कार्यकर्ते प्रचाराला लागले आहेत. दक्षिण मुंबईत मिलिंद देवरा यांच्यासाठीही मनसे कार्यकर्त्यांनी घरोघरी प्रचार सुरू केल्याचे चित्र आहे. त्यामुळे राजधानी मुंबईतल्या सर्वच लढती रंगतदार बनल्या आहेत.

मुंबई - राज्याची राजधानी असलेल्या मुंबईत भाजप-शिवसेनेचा बोलबाला असला, तरी महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) व आम आदमी पक्षाच्या (आप) मतदारांचा ‘बूस्टर’ आघाडीसाठी समाधानाची बाब असल्याचे चित्र आहे. 

मुंबईतल्या सर्वच्या सर्व सहा लोकसभा मतदारसंघांत मनसेचा मतदार असला, तरी उत्तर मुंबई, उत्तर पूर्व, उत्तर पश्‍चिम व दक्षिण मुंबई मतदारसंघांत मनसेचे उत्तम नेटवर्क आहे. या मतदारसंघांत मनसेच्या कट्टर कार्यकर्त्यांची फळी असून, स्थानिक प्रश्‍नांबाबत त्यांनी आंदोलन उभारत जनतेत जाऊन पक्षाची लढाऊ प्रतिमा कायम ठेवली आहे. 

मागील लोकसभा व विधानसभा निवडणुकांत मनसेने नरेंद्र मोदी यांना पाठिंबा देत काही मोजक्‍या जागा लढवल्या. २००९ मध्ये मनसेने सर्व मतदारसंघात सरासरी दीड लाखाच्या पुढे मते घेतली होती. तर २०१४ च्या विधानसभेत उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील विधानसभेत १ लाख ४५ हजाराहून अधिक मते घेतली. उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघातील सर्व सहा विधानसभेत मनसेला एक लाख दहा हजार मते मिळाली. तर दक्षिण मुंबईतही लाखाच्या पुढे मते मिळाली. इतर लोकसभा मतदारसंघात मनसेचा ६० ते ७० हजार मतदारांचा गठ्ठा असल्याचे मानले जाते.

Web Title: Loksabha Election 2019 Mumbai NCP Congress MNS Aghadi Politics