Loksabha 2019 : राज्यात मोदीविरोधी सुप्त लाट - अजित पवार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 10 एप्रिल 2019

मोदी गांधी घराण्याचे टीकाकार - अजित पवार
पंतप्रधानांनी कोणत्याही एका कुटुंबावर व्यक्तिगत टीका करायची नसते. त्यामुळेच आतापर्यंतच्या सर्व पंतप्रधानांपैकी मोदी यांचा अपवाद वगळता अन्य एकाही पंतप्रधानांनी व्यक्तिगत कोण्या एका कुटुंबावर टीका केलेली नाही. मोदी मात्र सातत्याने गांधी आणि पवार कुटुंबाविरोधी टीका करीत आहेत. हे योग्य नाही, असे अजित पवार यांनी सांगितले.

पुणे - शिरूर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस महाआघाडीचे डॉ. अमोल कोल्हे यांनी मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल केले. या वेळी राष्ट्रवादी व काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले.

‘राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात सुप्त लाट आहे. या लाटेचा फटका महायुतीच्या उमेदवारांना बसणार आहे. या उलट या सुप्त लाटेचा फायदा काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या उमेदवारांना होणार आहे,’’ असे मत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी (ता. ९) व्यक्त केले. 

शिरूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी मंगळवारी जोरदार शक्तिप्रदर्शन करीत अजित पवार आणि माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना पवार यांनी हे मत व्यक्त केले. या वेळी माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, बाळासाहेब शिवरकर, विलास लांडे, अशोक पवार, पोपटराव गावडे, कमल ढोले पाटील, जालिंदर कामठे, प्रदीप कंद, राजलक्ष्मी भोसले, संजय जगताप, प्रदीप गारटकर, सुरेश घुले, सत्यशील शेरकर, अतुल बेनके, मंगलदास बांदल, गणपतराव फुलवडे, ॲड. संजय काळे, देवदत्त निकम, विवेक वळसे पाटील आदी उपस्थित होते. डॉ. कोल्हे हे पुण्यातील लष्कर परिसरातील जनरल पोस्ट ऑफिसपासून (जीपीओ) रॅलीने जिल्हाधिकारी कार्यालयात आले. त्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी रमेश काळे यांच्याकडे त्यांनी चार उमेदवारी अर्ज दाखल केले.

शिरूर मतदारसंघातील वाहतूक कोंडी, पुणे-नाशिक रेल्वे, मंचर-राजगुरुनगरची बाह्यवळणे ही कामे झाली नाहीत. खेडचे विमानतळ पळवून लावले. खासदार आढळराव पाटील स्वतः उद्योजक असूनही त्यांनी गेल्या १५ वर्षांत एकही उद्योग उभा केला नाही. दिलेली आश्वासनेही त्यांनी पाळली नाहीत. त्यामुळे जनतेच्या मनात रोष आहे. 
 - अमोल कोल्हे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loksabha Election 2019 Narendra Modi Ajit Pawar Politics