Loksabha 2019 : मोदीमुक्‍त भारतासाठी मतदान करा - राज ठाकरे

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 20 मार्च 2019

मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी पाच वर्षांत देशाची वाट लावली आहे. देशाला वाचवायचे असल्यास या दोन व्यक्ती राजकीय पटलावरून दूर व्हायलाच हव्यात. लोकसभा निवडणुकीत कुणाला फायदा होणार किंवा तोटा, ही गोष्ट माझ्यासाठी महत्त्वाची नसून देश महत्त्वाचा आहे. त्यामुळे नागरिकांनी मोदीमुक्‍त भारतासाठी लोकसभा निवडणुकीत मतदान करावे, असे आवाहन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंगळवारी केले. मुंबईतील रंगशारदा सभागृहात झालेल्या पक्षाच्या मेळाव्यात ते बोलत होते.

यंदाची लोकसभा निवडणूक लढविणार नसल्याचे दोन दिवसांपूर्वी जाहीर केल्यानंतर या निवडणुकीसाठी पक्षाची भूमिका स्पष्ट करण्यासाठी राज यांनी हा मेळावा घेतला होता. भाषणात त्यांनी मोदी आणि शहा यांच्यावर ठाकरी शैलीत टीका केली. संपूर्ण आयुष्यात एवढे खोटे बोलणारा पंतप्रधान मी पाहिला नाही, अशी टीका करत त्यांनी मोदी यांनी पूर्वी केलेल्या भाषणाच्या चित्रफिती दाखविल्या. पाच वर्षे त्यांनी केवळ पंडित जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांना शिव्या देण्यात वाया घालवली. ज्या वल्लभभाई पटेल यांचा वारसा ते सांगतात; त्याच पटेलांचे स्मारक असलेल्या सरदार सरोवराचे भूमिपूजन पंडित नेहरू यांनी केले होते, अशी आठवण राज यांनी करून दिली.

स्वतःला "प्रधानसेवक' म्हणवणाऱ्या मोदींना हा शब्द कुठून आला, तेच माहीत नाही. पंडित नेहरू यांनीच हा शब्द रूढ केला होता. त्याचे पुरावे त्यांच्या स्मृतिभवनातील प्रतिमेवर असल्याचे ठाकरे म्हणाले.

निवडणुकीच्या प्रचारात सध्या चर्चिल्या जाणाऱ्या "चौकीदार' या शब्दावरही ठाकरे यांनी टोलेबाजी केली. पंतप्रधान स्वतःला "चौकीदार' म्हणतात. सर्वोच्च पदावरील व्यक्ती इतका छोटा विचार कसा करतो, असे सांगत तुम्ही चौकीदाराच्या भानगडीत पडू नका. या निवडणुकीत तुम्हाला मोदींविरोधात काम करायचे आहे, असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loksabha Election 2019 Narendra Modi Raj Thackeray Vote Politics