Loksabha 2019 : ‘पॅराशूट’वाले आणि ‘शॉर्टकट’वाले

Politics
Politics

जाहीर सभा, पक्षाचे व्यासपीठ, सभांमध्ये राहुल गांधी यांची आदर्शवादी वाक्‍ये टाळ्या घेऊन गेली; पण राजकीय व्यवहार्यता आणि अपरिहार्यतेने त्यांच्या वाक्‍यांना मुरड घालत ऐनवेळी पक्षात येणाऱ्यांना, सातत्याने घराणेशाहीने उमेदवारी करणाऱ्यांच्या घरातच पुन्हा उमेदवारी देणे गांधींना भाग पडल्याचे चित्र आहे.

‘पॅराशूट नेत्यांना उमेदवारी देणार नाही. शॉर्टकट घेणाऱ्यांना तुमचा हक्क हिरावू देणार नाही. एका घरातून दोन जणांना उमेदवारी मिळणार नाही,’ ही टाळ्याखाऊ वाक्‍ये राहुल गांधींनी उपाध्यक्ष असताना अनेकदा ऐकवली.

पक्षाध्यक्ष झाल्यानंतरदेखील ते बोलले. काँग्रेस अधिवेशनाच्या व्यासपीठावरूनही त्यांचे हेच उद्‌गार ऐकून कार्यकर्ते, आता पक्ष सुधारणार अशा भावनेने भारावले होते. परंतु लोकसभा निवडणुकीत राहुल गांधींच्या आदर्शवादी राजकारणाची जागा राजकीय व्यवहार्यतेने किंबहुना अपरिहार्यतेने घेतली आहे. गेल्या निवडणुकीत अवघ्या ४४ जागा मिळविणाऱ्या काँग्रेसचे संख्याबळ आता जास्तीत जास्त वाढवून भाजपला सत्तेपासून रोखण्याचा एकमेव हेतू त्यांच्यापुढे आहे, त्यामुळे जिंकून येण्याची क्षमता या त्यांच्या एकमेव निकषामुळे ‘पॅराशूट’वाले आणि ‘शॉर्टकट’वाल्यांनीदेखील उमेदवारी मिळविली आहे. अर्थात, बऱ्याच ठिकाणी उमेदवारही मिळत नसल्याची परिस्थिती काँग्रेसवर ओढविली आहेच, त्यामुळेही अशी स्थिती आहे.  

सोयीच्या मुद्द्यांवर सोईस्कर युक्तिवाद राजकारणात केला जातो. काँग्रेसमध्ये तर याची अनेक उदाहरणे सापडतात. पक्षात उमेदवारीबद्दल विचारल्यास, ‘केंद्रीय निवडणूक समिती’च (सीईसी) उमेदवार जाहीर करते, असे काँग्रेस नेते वारंवार सांगतात. पण स्वतः राहुल गांधींची वायनाडमधील उमेदवारी ‘सीईसी’ने नव्हे, तर प्रवक्‍त्यांनी जाहीर केली होती. तर, बहराईच आणि इटावा या उत्तर प्रदेशातील दोन मतदारसंघांत भाजपमधून आयात केलेल्या अनुक्रमे सावित्रीबाई फुले आणि अशोक दोहरे या नेत्यांना काँग्रेसने उमेदवारी दिली. ‘रंगिला गर्ल’ ऊर्मिला मातोंडकर यांची उत्तर मुंबई मतदारसंघातून जाहीर झालेली उमेदवारीदेखील याच ‘पॅराशूट’ श्रेणीतली. 

आयत्या वेळी काँग्रेसमध्ये प्रवेश करून हिमाचल प्रदेशातील मंडीमध्ये उमेदवारी मिळविणारे आश्रय शर्मा हे तर पॅराशूट आणि शॉर्टकट असे दोन्ही निकष साधणारे. माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांच्या सरकारमधील वादग्रस्त मंत्री सुखराम यांचे ते नातू. काँग्रेस नेतृत्वावरील नाराजीनंतर सुखराम यांच्या गटाने हिमाचलच्या राजकारणात भाजपला मदत केली. त्यांचे पुत्र अनिल शर्मा हे तर आताच्या भाजप सरकारमध्ये मंत्रीही आहेत.

नातू आश्रयसोबत सुखराम अवघ्या काही दिवसांपूर्वीच काँग्रेसमध्ये आले आणि तिसऱ्या पिढीचे राजकीय करिअर सुरू झाले. ‘गांधीवादी’ नेते आणि राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे पुत्र वैभव गेहलोत जोधपूरमधून उमेदवार झाले आहेत. याआधी राजस्थान विधानसभा निवडणुकीत ते नशीब आजमावणार असल्याची चर्चा होती. आता लोकसभा निवडणुकीत कौल मागणार आहेत. आता तर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांचे पुत्र नकुलनाथ यांनाही उमेदवारी मिळण्याची शक्‍यता आहे. 

नेत्यांच्या नातेवाइकांचीच सरशी
याच मालिकेतला आणखी एक चेहरा म्हणजे, यामध्ये वरिष्ठ नेते पी. चिदंबरम यांचे पुत्र कार्ती चिदंबरम. चिदंबरम यांच्याबद्दलच्या आकसातून कार्ती यांना भाजपने गोवल्याचा आरोप क्षणभर मान्यही करायचा झाला, तरी गैरव्यवहाराच्या आरोपांखाली न्यायालयाच्या खेटा घालणाऱ्या या कार्ती महाशयांचा राजकीय वकूब यथातथाच आहे. तमिळनाडूतल्या शिवगंगा मतदारसंघात ते मागील निवडणुकीत तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेलेले. पण, शिवगंगाचे तब्बल सात वेळा प्रतिनिधित्व करणाऱ्या पी. चिदंबरम यांची पुण्याई पुत्राला उमेदवारी मिळवून देण्यात कामास आली आहे. याच मतदारसंघाचे एकदा प्रतिनिधित्व करणारे माजी राज्यमंत्री सुदर्शन नचिअप्पन हे या वेळी प्रयत्नशील होते. डागाळलेला उमेदवार देऊन पक्षाने घोडचूक केल्याचे त्यांनी जाहीरपणे म्हटले आहे. 

या व्यतिरिक्त आसामचे माजी मुख्यमंत्री तरुण गोगोई यांचे खासदारपुत्र गौरव गोगोई यांना कालियाबोरमधून उमेदवारी मिळालीय. कालियाबोर मतदारसंघ सात वेळा गोगोई कुटुंबाकडेच राहिलाय. महाराष्ट्रातच माजी मंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते रोहिदास पाटील यांचे पुत्र कुणाल यांना धुळ्यातून उमेदवारी आधीच दिली आहे. हरियानामध्ये माजी मुख्यमंत्री भूपिंदरसिंह हुडा यांचे पुत्र दीपेंद्र यांना पुन्हा उमेदवारी मिळणार आहेच. दिल्लीत माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचे पुत्र संदीप दीक्षित यांनाही उमेदवारी मिळेलच, अशी चिन्हे आहेत. आतापर्यंत लोकसभेसाठी काँग्रेसने ३१५ उमेदवार जाहीर केले आहेत, तर ४४० उमेदवार देण्याचे पक्षाचे नियोजन आहे. साहजिकच असे पॅराशूट चेहरे वाढूही शकतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com