Loksabha 2019 : प्रियांका चतुर्वेदी शिवबंधनात

मुंबई - काँग्रेसच्या माजी प्रवक्‍त्या प्रियांका चतुर्वेदी यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत शुक्रवारी शिवसेनेत प्रवेश केला. आदित्य ठाकरे यांनी त्यांना शिवबंधन बांधले.
मुंबई - काँग्रेसच्या माजी प्रवक्‍त्या प्रियांका चतुर्वेदी यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत शुक्रवारी शिवसेनेत प्रवेश केला. आदित्य ठाकरे यांनी त्यांना शिवबंधन बांधले.

मुंबई - काँग्रेच्या राष्ट्रीय प्रवक्‍त्या आणि ‘मीडिया सेल’च्या समन्वयक प्रियांका चतुर्वेदी यांनी शुक्रवारी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देत शिवसेनेत प्रवेश केला. मातोश्री येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवा नेते आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत चतुर्वेदी यांनी हातात शिवबंधन बांधले. या वेळी चतुर्वेदी यांच्यावर राष्ट्रीय पातळीवरील मोठी जबाबदारी देण्यात येणार असल्याची घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली.

काँग्रेसच्या काही ज्येष्ठ नेत्यांनी गैरवर्तणूक केल्याचा आरोप चतुर्वेदी यांनी या वेळी केला. या गंभीर प्रकरणाची पक्षाने दखल घेतली नसल्याची खंतही प्रियांकांनी व्यक्त केली. प्रियांका यांनी आधी ट्‌विटरच्या माध्यमातून काँग्रेसचा राजीनामा देत असल्याचे जाहीर केले. जड अंतःकरणाने हा निर्णय आपण घेतल्याचे त्यांनी म्हटले आहे. दहा वर्षांपूर्वी मुंबईमध्ये युवक काँग्रेसमध्ये मी प्रवेश केला होता. सर्वसमावेशक, मुक्त व पुरोगामी अशा काँग्रेसच्या आदर्शांवर माझा विश्वास होता, असेही त्यांनी म्हटले आहे.

पक्षाची सेवा करताना मला, माझ्या कुटुंबीयांना व मुलांना किती धमक्‍या आल्या, किती शिवीगाळ झाली, याची तुम्हाला आठवण करून द्यायला नकोच. माझ्या आकांक्षांना काँग्रेस पक्ष योग्य वाव देईल, या अपेक्षेमुळे मी कधीही काही मागितलं नाही, असे प्रियाकांनी नमूद केले. परंतु त्यांच्याशी झालेल्या गैरवर्तणुकीची दखल पक्षाने घेतली नसल्याची खंत मात्र चतुर्वेदींनी व्यक्त केली. ‘‘मला खेद वाटतो, की काँग्रेस पक्ष महिलांची सुरक्षा, सन्मान व सबलीकरणाला प्राधान्य देतो; परंतु ते कृतीत मात्र दिसले नाही,’’ असे त्या म्हणाल्या. पक्षाचे काम करत असताना काही ज्येष्ठ नेते अत्यंत असभ्यपणे माझ्याशी वागले; परंतु त्यांच्या या अक्षम्य दुर्वर्तनाकडे निवडणुकीची गरज म्हणून दुर्लक्ष करण्यात आल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. त्यामुळे आता मला काँग्रेसच्या पलीकडे बघण्याची गरज आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

संपूर्ण देश तीन दिवस माझ्या मागे असून मी प्रत्येकापोटी कृतज्ञ असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे. काँग्रेसच्या मीडियाच्या सगळ्या व्हॉट्‌सॲप ग्रुपमधून चतुर्वेदी बाहेर पडल्या आहेत, तसेच त्यांनी त्यांच्या ट्‌विटरवरील काँग्रेसचे पददेखील हटवले आहे. चतुर्वेदींनी काँग्रेसच्या नेत्यांकडे राजीनामा सोपवला आहे. दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी चतुर्वेदी यांच्याकडे मोठी जबाबदारी सोपवणार असल्याचे सांगितले.

मुंबई युवक काँग्रेसची सदस्य म्हणून मी दहा वर्षांपूर्वी कामाला सुरवात केली. पक्षाने विविध व्यासपीठांवर शिकण्याची, प्रगतीची संधी दिली. पण गेल्या काही आठवड्यांपासून अशा काही घटना घडल्या, की माझ्या सेवेची पक्षाला किंमत नसल्याची जाणीव मला होत गेली.
- प्रियांका चतुर्वेदी

काँग्रेस कुटुंबातून कोणत्याही कार्यकर्त्याचे बाहेर जाणे दुःखदायक आहे. मात्र करिअरच्या नव्या संधीसाठी अशा प्रकारचे निर्णय घेतले जातात. प्रियांका चतुर्वेदींसह अशा सर्वांना काँग्रेसच्या शुभेच्छाच आहेत
- रणदीप सुरजेवाला, काँग्रेसचे प्रवक्ते

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com