Loksabha 2019 : मोहिते पाटलांच्या वाड्यावर ‘कमळ’

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 20 मार्च 2019

अकलूज - सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर सत्ताधारी भाजपमधील इनकमिंग वाढले आहे. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र सुजय विखे यांच्यापाठोपाठ आता राष्ट्रवादी काँग्रेसचे बडे मनसबदार विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुत्र रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याची घोषणा आज केली.

अकलूज - सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर सत्ताधारी भाजपमधील इनकमिंग वाढले आहे. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र सुजय विखे यांच्यापाठोपाठ आता राष्ट्रवादी काँग्रेसचे बडे मनसबदार विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुत्र रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याची घोषणा आज केली.

काँग्रेसपाठोपाठ आता राष्ट्रवादीलाही मोठा धक्का बसला असून, खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आणखी काही बडे नेते भाजपात प्रवेश करण्यासाठी उत्सुक असल्याचे सांगत ‘आगे आगे देखो होता है क्‍या’ असे सूचक विधान केले. ‘‘तुमच्या सर्वांच्या भावनांचा आदर करून आणि कृष्णा-भीमा स्थिरीकरण योजनेसह आपल्या भागाच्या विकासाच्या योजना मार्गी लागल्या पाहिजेत यासाठी मी उद्या भाजपमध्ये प्रवेश करीत आहे, अशी घोषणा माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी आज केली.

रणजितसिंहांच्या भूमिकेला माझी सहमती आहे, असे खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांनी सांगितले. मोहिते-पाटील पिता-पुत्राच्या या घोषणेमुळे आता जिल्ह्यातील राजकीय समीकरणेच बदलणार आहेत. 

बदलत्या परिस्थितीत काय निर्णय घ्यायचा याबाबत खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांनी आज कार्यकर्त्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीला माढा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना, शेकापचे पदाधिकारी व मोहिते-पाटील समर्थक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मोहिते पाटलांच्या भाजप प्रवेशाला पाठिंबा देण्यासाठी आलेल्या कार्यकर्त्यांचा उत्साह दांडगा होता. कोणत्याही परिस्थितीत रणजितसिंहानी लोकसभेची निवडणूक लढवली पाहिजे, असा आग्रह सर्वांनीच या वेळी धरला.

या वेळी बोलताना रणजितसिंह म्हणाले, ‘‘शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी, शेती, पाणी, कारखानदारी यासाठी सहकारमहर्षी शंकरराव मोहिते-पाटील यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेसमध्ये वसंतदादा आणि सहकारमहर्षींनी एका विचाराने काम केले. खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांनी तोच विकासाचा वारसा पुढे चालवला आहे. गेल्या पाच वर्षांत खा. विजयसिंहांनी अनेक कामे मार्गी लावली. राष्ट्रीय महामार्ग, शंभर वर्षे रेंगाळलेला लोणंद-पंढरपूर रेल्वेमार्ग त्यांच्यामुळे मंजूर होऊन त्यासाठी आर्थिक तरतूद झाली. सहा जिल्हे व ३१ तालुक्‍यांसाठी कृष्णा-भीमा स्थिरीकरण योजना होणे गरजेचे आहे. ही योजना फक्त नरेंद्र मोदी पूर्णत्वाला नेऊ शकतात, हा विश्वास आहे. कार्यकर्त्यांची भावना आणि विकासाच्या योजना मार्गी लागाव्यात यासाठी मी भाजप प्रवेश करीत आहे.’’

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रवेश
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्या (ता. २०) दुपारी साडेबाराची वेळ दिली आहे. वानखेडे स्टेडियमजवळील गरवारे जिमखाना येथे मुख्यमंत्री, भाजपचे प्रदेशाध्यक्ष यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन त्यांनी या वेळी केले. त्यानंतर बोलताना खासदार मोहिते-पाटील यांनी रणजितसिंहांच्या भूमिकेला त्यांची सहमती असल्याचे सांगितले.

कार्यकर्त्यांचा संकल्प
माढा लोकसभा जिंकूच, पण सोलापूर लोकसभा मतदारसंघाचा निर्णयही बदलून दाखवू, असा संकल्प कार्यकर्त्यांनी या वेळी केला. ताकाला जाऊन मोगा कशाला दडवायचाय. निर्णय झालेलाच आहे, त्यामुळे आपण आता घोषणा देऊया, असे म्हणत करमाळ्याच्या सविताराजे यांनी हर हर चा नारा दिला आणि उपस्थित कार्यकर्त्यांनी त्याला महादेव असा प्रतिसाद दिला. ‘हर हर महादेव’च्या घोषणा देत मोहिते पाटील समर्थकांनी भाजप प्रवेशाचे रणशिंग फुंकले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loksabha Election 2019 Ranjitsinh Mohite Patil Madha Politics