Loksabha 2019 : शेतकरी संघटना निवडणुकीच्या मैदानातून गायब

Shetkari-Sanghatana
Shetkari-Sanghatana

सोलापूर - लोकसभा निवडणुकीची सध्या राजकीय धामधूम सुरू आहे. राज्यात शेतकरी संघटनांचे प्राबल्य असणारे काही मतदारसंघ आहेत. त्यात सोलापूर जिल्ह्यातील माढा मतदारसंघाचा समावेश होतो. गतवेळी माढा मतदारसंघात भाजप-शिवसेना महायुतीकडून ‘स्वाभिमानीच्या’वतीने कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत मैदानात उतरले होते. पण यंदा सदाभाऊ बाहेर पडल्याने आणि ‘स्वाभिमानी’चे घोडे हातकणगंलेवरच अडल्याने अन्य ठिकाणी त्यांना स्थान मिळाले नाही. बळीराजा शेतकरी संघटनेने फक्त निर्णय घेतला आहे. पण अद्याप त्यांच्याही काहीच हालचाली नाहीत. शरद जोशी प्रणित शेतकरी संघटना आणि रघुनाथ पाटील प्रणित शेतकरी संघटना या तर कुठेही दिसत नाहीत. त्यामुळे एरवी शेतकरी प्रश्‍नासाठी रस्त्यावर उतरणाऱ्या शेतकरी संघटना निवडणुकीच्या मैदानातून मात्र गायब असल्याचे चित्र आहे.

सोलापूर जिल्ह्यात सोलापूर आणि माढा हे दोन लोकसभा मतदारसंघ आहेत. सोलापूरच्या तुलनेत माढा मतदारसंघात बहुसंख्येने ग्रामीण भाग अधिक आहे. त्यामुळे या मतदारसंघावर पहिल्यापासूनच राजकीय पक्षांचे लक्ष आहे. गेल्या दोन निवडणुकांत राष्ट्रवादी काँग्रेसने या मतदारसंघावर आपली पकड कायम ठेवली आहे. पहिल्यांदा माजी कृषिमंत्री, ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी येथून निवडणूक लढवली. त्यानंतर राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी लढवली. दोन्हीवेळेस राष्ट्रवादी काँग्रेसने बाजी मारली. गतवेळच्या निवडणुकीत कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी ‘स्वाभिमानी’कडून मोहिते-पाटील यांना लढत दिली. त्यावेळी पहिल्यांदाच शेतकरी संघटनेला महत्त्व आले. पण यंदाच्या निवडणुकीत मात्र महायुती किंवा महाआघाडी यांच्याकडून शेतकरी संघटना आणि शेतकरी नेत्यांना फारशी ‘किंमत’ मिळाली नसल्याचे दिसते. महाआघाडीने स्वाभिमानी संघटनेला दोन जागा देण्याचे कबूल केले. त्यात राजू शेट्टी यांच्यासाठी हातकणंगले मतदारसंघ सोडून कार्यतत्परता दाखवली, पण सांगलीचा पेच अद्याप सुटलेला नाही. दुसरीकडे सदाभाऊ खोत यांची रयत क्रांती संघटना सत्ताधारी भाजप-सेनेबरोबर आहे. पण ती फारशी प्रभाव पाडू शकलेली नाही. त्यामुळे भाजप-सेनेकडून त्यांच्या संघटनेला सरळ ठेंगा दाखवण्यात आला आहे. एरवी शेतकऱ्यांच्या प्रश्‍नासाठी सत्ताधारी आणि विरोधकांना जेरीस आणणाऱ्या शरद जोशी प्रणित शेतकरी संघटना, रघुनाथ पाटील प्रणित शेतकरी संघटना या तर कुठेही दिसत नाहीत. सत्तेच्या चाव्या सहजपणे फिरवू शकणाऱ्या शेतकरी घटकाला कोणीच फारशी दाद देत नसल्याने ताकद दाखवण्याची हीच वेळ आहे. त्यासाठी नेत्यांनी रणशिंग फुंकले पाहिजे, पण नेत्यांनाच त्यात फारसा रस नसल्याने (की कोणी विचारत नसल्याने) शेतकरी संघटना आता राजकारण्यांच्यादृष्टीने अडगळीत पडल्या आहेत. माढा हा तर साखर उत्पादक आणि कारखानदारीचा पट्टा आहे. या मतदारसंघातले सगळे विषय हे शेतीच्या भोवतीच फिरतात, पण सध्या तरी या सगळ्यात शेतकरी संघटना मात्र अद्यापही दूरच आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com