Loksabha 2019 : जुनेच मावळे मैदानात

Shivsena-Candidate
Shivsena-Candidate

मुंबई - लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेच्या २१ उमेदवारांची नावे आज जाहीर करण्यात आली. शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी उमेदवार जाहीर करताना सातारा आणि पालघर मतदारसंघातील नावे लवकरच घोषित केली जातील, असे सांगितले.

लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर आता उमेदवारांची नावे जाहीर करण्याची लगबग सुरू झाली आहे. काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसनंतर आता भाजप- शिवसेनेनेही राज्यातील उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. युती झाल्यानंतर राज्यातील ४८ जागांपैकी भाजप २५, तर शिवसेना २३ जागा लढवणार आहे. यातील २१ उमेदवार शिवसेनेने घोषित केले आहेत. तर पालघर आणि सातारा या जागांचे उमेदवार रविवारी जाहीर होतील.

पहिल्या यादीतील २१ पैकी १९ विद्यमान खासदारांना उमेदवारी देण्यात आली असून जुनेच मावळे मैदानात उतरल्याचे चित्र पहायला मिळत आहे. हिंगोली आणि उस्मानाबाद या दोन जागांमध्ये बदल करण्यात आले आहेत. हिंगोलीत हेमंत पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. उस्मानाबादमध्ये रवी गायकवाड यांना वगळून ओमराजे निंबाळकर यांना तिकीट देण्यात आले आहे.

नरेंद्र पाटील - ठाकरे भेट
राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये दाखल झालेले माथाडी नेते, माजी आमदार नरेंद्र पाटील यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आज मातोश्रीवर भेट घेतली. सातारा लोकसभा मतदारसंघातून शिवसेना नरेंद्र पाटलांना उमेदवारी देणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे आता साताऱ्यात उदयनराजे विरुद्ध नरेंद्र पाटील असा सामना रंगणार असल्याची चर्चा आहे. नरेंद्र पाटील हे राष्ट्रवादीचे माजी आमदार आहेत आणि सध्या त्यांच्याकडे अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास महामंडळाचे अध्यक्षपद आहे.

संजय जाधव यांचा मार्ग मोकळा
परभणीचे शिवसेना उमेदवार संजय जाधव यांच्या मार्गातील अडथळा दूर झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समजूत घतल्यानंतर भाजप नेत्या मेघना बोर्डीकर यांनी माघार घेतली आहे. यासाठी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी आज मुख्यमंत्र्यांकडे मध्यस्थी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com