Loksabha 2019 : विजयसिंह यांनाच उमेदवारी देणार होतो - अजित पवार

Ajit-Pawar
Ajit-Pawar

पुणे - माढा लोकसभा मतदारसंघातून विजयसिंह मोहिते पाटील यांनी लढावे, असे शरद पवार यांनी त्यांना स्पष्टपणे सांगितले होते. मी त्याचा साक्षीदार आहे; मात्र मोहिते पाटलांनी दुसऱ्याच नावाचा आग्रह धरला अन्‌ शेवटचे दोन दिवस फोन बंद करून ठेवला होता, असे भाष्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी मोहिते पाटील यांच्याबद्दल गुरुवारी केले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात पवार बोलत होते. माढा मतदारसंघातून रणजितसिंह मोहिते पाटील यांना राष्ट्रवादीने उमेदवारी नकारली. त्यामुळे त्यांनी दोन दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. याबाबत अजित पवार यांनी प्रथमच भाष्य केले; पण रणजितसिंह यांचे नाव घेण्याचे त्यांनी टाळले. 

ते म्हणाले, ‘‘माढ्यातून विजयसिंह मोहिते पाटील यांना उमेदवारी द्यायचे पक्षाने ठरविले होते; पण त्यांनी स्वतःऐवजी जे नाव पुढे केले होते, त्याला माळशिरसवगळता मतदारसंघाच्या इतर भागातून विरोध होता. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि पवार साहेबांचे पीए हे दोघेही विजयसिंह मोहिते पाटील यांना सातत्याने फोन करत होते. मात्र, शेवटचे दोन दिवस त्यांनी फोन बंद करून ठेवला होता.’’

...तेव्हा जात का आठवली नाही? 
‘‘शिरूर लोकसभा मतदारसंघात काही लोकांकडून आमच्या उमेदवाराची वारंवार जात काढली जात आहे. जे आज जात काढत आहेत, ते यापूर्वी तीन वेळा या मतदारसंघातून निवडून आले आहेत. तेव्हा त्यांना जात का आठवली नाही ?’’, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी गुरुवारी उपस्थित केला.  

पवार म्हणाले, ‘‘गेली २५ वर्षे युती सडली म्हणणारे, अफजल खानाची उपमा देणारे, आज पुन्हा एकत्र आले आहेत. आता त्यांना इतरांच्या जाती आठवत आहेत. कोणत्याही परिस्थितीमध्ये मला हडपसर विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादीचे शिरूरचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांना प्रचंड मताधिक्‍य हवे आहे. सर्व कार्यकर्त्यांनी मतभेद विसरून आघाडी टिकविण्यासाठी आणि वाढविण्यासाठी काम केले पाहिजे. 

पुणे लोकसभेचा काँग्रेसचा उमेदवार जाहीर होणे गरजेचे होते, मात्र तो जाहीर होईपर्यंत कार्यकर्त्यांनी इतर मतदारसंघात जाऊन पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार करावा. आपला मतदारसंघ सांभाळून दुसऱ्या मतदारसंघातील काम करावे.’

स्वतःचा मतदारसंघ सांभाळा !
काही जण स्वतःचा मतदारसंघ सोडून थेट राज्य पातळीवरच प्रचाराला जातात. असे न करता स्वतःचा मतदारसंघ आणि आघाडीचा धर्म पाळा, एक महिनाभर रात्री उशिराच घरी जा, जे ‘सूर्यमुखी’ असतील त्यांनी सकाळी लवकर उठावे, दुपारच्या वेळी सहकाऱ्यांसोबतच जेवण करावे, महिनाभर वामकुक्षी सोडा, केवळ लग्न आणि साखरपुड्यांना हजेरी लावून प्रचार करू नका, असा सल्लाही अजित पवार यांनी दिला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com