Loksabha 2019 : मनोमिलन करताना युतीची दमछाक होणार

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 15 मार्च 2019

मुंबई - सत्तेत सहभागी असतानाही साडेचार वर्षे एकमेकांवर चिखलफेक केल्याने लोकसभा निवडणुकीत दुभंगलेली मने एकत्र करण्यासाठी शिवसेना आणि भाजप नेत्यांची दमछाक होणार आहे.

मुंबई - सत्तेत सहभागी असतानाही साडेचार वर्षे एकमेकांवर चिखलफेक केल्याने लोकसभा निवडणुकीत दुभंगलेली मने एकत्र करण्यासाठी शिवसेना आणि भाजप नेत्यांची दमछाक होणार आहे.

शिवसेना-भाजप नेत्यांनी एकमेकांवर जहरी टीका केली होती. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी युती होणार नसल्याची घोषणा करून शिवसैनिकांना कामाला लागण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे राज्यभरात शिवसैनिक आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये अनेकदा हातघाई झाल्याच्या घटना घडल्या होत्या. आता लोकसभा निवडणुकीसाठी युती झाल्याने दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना एकत्रपणे प्रचार करावा लागणार आहे.

उद्धव ठाकरे यांनी मध्यस्थी केली असली तरी जालन्यात राज्य मंत्री अर्जुन खोतकर शांत झालेले नाहीत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचा पराभव करण्यासाठी खोतकर इरेला पेटले आहेत.

निवडणुकीचे आजपर्यंतची सर्व सर्वेक्षणे माझ्या बाजूने आहेत. मी लढण्यास इच्छुक असून उद्धव ठाकरे माझ्या बाबतीत योग्य निर्णय घेतील, असे खोतकर यांनी जाहीर केले आहे. खोतकर आणि दानवे यांच्यातील राजकीय वैर भाजप-शिवसेना युतीसाठी डोकेदुखी ठरत आहे.

भाजपच्या संभाव्य लोकसभा उमेदवारांच्या यादीत रावसाहेब दानवेंचे नाव आहे. मात्र मी अद्यापही निवडणुकीच्या रिंगणात असल्याचे खोतकरांनी म्हटले आहे. उद्धव ठाकरेंनी आदेश दिल्यास मी निवडणूक लढण्यास तयार असल्याचे खोतकरांनी जाहीर केल्याने दानवे यांची चिंता वाढली आहे.

शिवसेनेतही अंतर्गत वादाला तोंड फुटले आहे. रायगड मतदारसंघात अनंत गिते यांच्याबाबत नाराजी असल्याने त्यांच्यासाठी काम करण्याची इच्छा नसल्याचा निरोप शिवसेना पदाधिकाऱ्यांनी "मातोश्री'वर दिल्याची चर्चा आहे. हीच अवस्था अन्य मतदारसंघांतही असल्याचे समजते. वाशीम-यवतमाळमध्ये खासदार भावना गवळी आणि राज्यमंत्री संजय राठोड यांच्यात विस्तवही जात नाही. उद्धव ठाकरे यांच्यावर सातत्याने टीका केल्याने ईशान्य मुंबईत किरीट सोमयांना धडा शिकविण्याचा विडा शिवसैनिकांनी उचलला आहे.

Web Title: Loksabha Election 2019 Yuti Shivsena BJP Politics