भाजपच्या मेळाव्यात शिवरायांचा विसर

औरंगाबाद - शिवसेना-भाजपची युती तर झाली; पण तू-तू मै-मै सुरू आहे. आता नेमके करायचे तरी काय, असा विचार भाजपच्या बूथप्रमुख, शक्तिकेंद्र प्रमुखांच्या बैठकीदरम्यान विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे करीत नसावेत ना...?
औरंगाबाद - शिवसेना-भाजपची युती तर झाली; पण तू-तू मै-मै सुरू आहे. आता नेमके करायचे तरी काय, असा विचार भाजपच्या बूथप्रमुख, शक्तिकेंद्र प्रमुखांच्या बैठकीदरम्यान विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे करीत नसावेत ना...?

औरंगाबाद - ‘शिवछत्रपतींचा आशीर्वाद, चला देऊ मोदींना साथ’ अशा घोषणा, बॅनरनी गेल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात रंग भरणाऱ्या भाजपला लवकरच होणाऱ्या याच निवडणुकीच्या पूर्वतयारीसाठीच्या मेळाव्यात शिवरायांचा विसर पडला. येथे बूथप्रमुखांच्या शनिवारी झालेल्या या मेळाव्यात शिवरायांचा ना फोटो होता, ना पुतळा. विशेष म्हणजे भाजपशी संबंधित इतरांच्या प्रतिमांना हार घातलेले होते. रयतेने मोठ्या जल्लोषात नुकतीच शिवजयंती साजरी केलेली असताना भाजपमधीलच शिवप्रेमींना हा ‘विसर’ पडलाच कसा, असा प्रश्‍न मते देणाऱ्या जनतेला पडला आहे.

औरंगाबादसह साऱ्या मराठवाड्यात शिवजयंती मोठ्या जल्लोषात साजरी झाली. पताका, झेंड्यांनी गावे, शहरे सजली. वाहनांवर झेंडे लावून फेऱ्या काढण्यात आल्या, तशा भगव्या झेंड्यांनी वाजत-गाजत, शिवरायांचा जयघोष करीत मोठमोठ्या मिरवणुका निघाल्या. सामाजिक भान जपत रक्तदान शिबिरांसह अनेक उपक्रम राबविले गेले आणि हुतात्मा जवानांच्या कुटुंबीयांना मदतीसाठी अनेक हात सरसावले. लहान मुले, महिला, तरुणाईने या उत्सवात अक्षरशः झोकून दिले. खऱ्या अर्थाने शिवरायांना प्रिय असलेल्या रयतेने हा उत्सव साजरा केला. अर्थात त्यात भाजपचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्तेही होतेच. या साऱ्या जल्लोषी वातावरणाच्या पार्श्‍वभूमीवर शिवजयंतीनंतर केवळ चारच दिवसांनी झालेल्या भाजपच्या मेळाव्यात शिवरायांचा विसर पडावा, हेच मोठे नवल! पुढील काळात शिवरायांच्या नावावर मतांचा जोगवा मोठ्या अधिकारवाणीने मागितला जाईल; कारण बहुचर्चेअंती शिवसेनेची भाजपशी युती झाली आहे. मग निवडणुकांच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून बूथप्रमुखांना टीप्स देण्यासाठी झालेल्या मेळाव्यात शिवरायांचे विस्मरण कसे, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. 

येथील श्रीहरी पॅव्हेलियनमध्ये चार जिल्ह्यांतील बूथप्रमुख, भाजपच्या शक्तिकेंद्र प्रमुखांचा आज दुपारी हा मेळावा झाला. व्यासपीठाच्या मागे लावलेल्या भव्य बॅनरवर राष्ट्रीय नेते होते. व्यासपीठावर श्‍यामाप्रसाद मुखर्जी, पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमा होत्या. त्यांना हार घातलेला होता. 

नव्हती ती शिवरायांची प्रतिमा किंवा पुतळा. ‘पांढऱ्या पायांचे’ असे हिणवून प्रदेशाध्यक्षांनी विरोधकांवर टीकेची झोड उठवली आणि आपल्या शक्तिकेंद्र प्रमुखांत तरतरी, जान आणली. कामाला लागण्याचे फर्मान सोडले. मेळाव्याच्या तयारीत शिवरायांची प्रतिमा ठेवावी, असे फर्मान सोडण्यास ते कसे विसरले? सभागृहात आल्यावर तरी लक्षात आले नाही का, असे एक ना अनेक सवाल जनतेला पडले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com