Loksabha 2019 : राज ठाकरेंचे कुटुंब पावणे दोन तास रांगेत

सकाळ वृत्तसेवा
Monday, 29 April 2019

आज दुपारी 11.40 वाजण्याच्या सुमारास राज दादर येथील बालमोहन शाळेत मतदानासाठी सहकुटुंब पोहोचले. मतदानासाठी मोठी रांग होती. सर्वसामान्य मतदाराप्रमाणेच राजही मतदानासाठी रांगेत उभे राहिले. सुमारे दीड तास रांगेत थांबल्यानंतर त्यांना मतदान करता आले.

मुंबई : 'लाव रे तो व्हिडिओ' म्हणत भाजप-शिवसेना युतीला घाम फोडणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (सोमवार) सुमारे पावणे दोनतास रांगेत उभे राहून मतदान केले. राज मतदान केंद्रावर आल्याबरोबर माध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांना गाठण्याचा प्रयत्न केला. पण राज यांनी आधी मतदान करायला जाणे पसंद केले. 

आज दुपारी 11.40 वाजण्याच्या सुमारास राज दादर येथील बालमोहन शाळेत मतदानासाठी सहकुटुंब पोहोचले. मतदानासाठी मोठी रांग होती. सर्वसामान्य मतदाराप्रमाणेच राजही मतदानासाठी रांगेत उभे राहिले. सुमारे पावणे दोन तास रांगेत थांबल्यानंतर त्यांना मतदान करता आले. दरम्यान मुंबईत आज सेलिब्रीटी,कॉर्पोरेट जगतातील मतदारांसह सर्व सामान्य मतदार रांगेत उभे राहून मतदानाचा हक्क बजावत आहेत. आतापर्यंत सर्वाधिक मतदान उत्तर मुंबईत झाले असून काही ठिकाणी सकाळी ईव्हीएम मशिन बंद पडल्यामुळे मतदारांना ताटकळत उभे राहावे लागले. ईव्हीएम मशिन बंद पडल्याने अनेक विभागात नाराजी व्यक्त केली जात आहे. व्हिव्हिपॅट मशिनमुळे एक मत नोंदवायला किमान सात सेकंद लागत असल्याने काही ठिकाणी रांगा लागल्या होत्या. 

मुंबईत आज लोकसभेच्या चौथ्या टप्प्याचे मतदान होत आहे. गुजराती आणि मुस्लिम बहुल परीसरात मतदानांचा जोर जाणवत आहे. तर, मराठी मतदार असलेल्या भागात मतदानाचा टक्का धिम्म्या गतीने पुढे जात आहे. 

पवई येथील तिरंदाज व्हिलेट महानगर पालिका शाळेत दोन ईव्हीएम मशिन एक ते दिड तास बंद होत्या. त्यामुळे मतदानाची वेळ वाढवून देण्याची मागणी करण्यात आली आहे. तर, मालाडमध्येही अशीच परीस्थिती होती. कलिना, कुर्ला परीसरातही काही काळ मतदान मशिन बंद होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MNS chief Raj Thackeray casts vote in Mumbai for Loksabha election