Loksabha 2019 :  रावेरच्या बदल्यात पुणे मागितले नाही - अजित पवार

Loksabha 2019 :  रावेरच्या बदल्यात पुणे मागितले नाही - अजित पवार

पुणे - "रावेर मतदारसंघ कॉंग्रेसला सोडल्याच्या बदल्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसने पर्यायी मतदारसंघ मागितलेला नाही. जातीयवादी शक्तींना हरवून जास्तीत जास्त जागा निवडून आणण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेतला आहे,' असे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी स्पष्ट केले, त्यामुळे रावेरच्या मोबदल्यात पुणे या विषयाला त्यांनी पूर्णविराम दिला. 

रावेर मतदारसंघ कॉंग्रेसला सोडल्याची घोषणा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शुक्रवारी सकाळी केली. गेल्या काही दिवसांपासून रावेत आणि पुणे या दोन्ही मतदारसंघांत बदल होण्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती, त्यामुळे कॉंग्रेसच्या पुण्यातील उमेदवाराची घोषणा करण्यास वेळ लागत असल्याचे बोलले जाते आहे. दरम्यान, आज पुण्यात एका बैठकीसाठी अजित पवार आले होते. त्या वेळी त्यांना विचारले असता त्यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली. "कोण किती जागा लढवतेय, याला जास्त महत्त्व न देता जास्तीत जास्त जागा निवडून आणण्याच्या उद्देशाने आणि तेथील कार्यकर्त्यांमध्ये वातावरण चांगले राहण्यासाठी रावेरचा निर्णय घेण्यात आला आहे.' 

पवार म्हणाले, ""जळगाव जिल्ह्यात जळगाव आणि रावेर हे दोन मतदारसंघ आहेत. कॉंग्रेसच्या तेथील कार्यकर्त्यांचे म्हणणे होते, की जिल्ह्यातील रावेरची जागा आम्हाला सोडली, तर आमच्या कार्यकर्त्यांनादेखील तेथे काम करण्याची संधी मिळेल. जागावाटपाच्या चर्चेच्या वेळेस आम्ही रावेरची जागा सोडण्याबाबत पर्यायी जागेची मागणी केली होती; परंतु या वेळेला भाजप- शिवसेनेसारख्या जातीयवादी पक्षांचा पराभव करण्यासाठी समविचारी पक्ष एकत्र आले आहेत. त्यामुळे मतांची विभागणी टाळण्याचा निर्णय आम्ही घेतला होता. चांगले होणार असेल, तर त्यात टोकाची भूमिका घेण्याची आवश्‍यकता नाही.'' 

पुण्याबाबत चर्चा नाही - पाटील 
दरम्यान, पुण्याच्या जागेबाबत अद्याप माझ्या स्तरावर कोणतीही चर्चा झालेली नाही, असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शुक्रवारी ट्विटरद्वारे स्पष्ट केले. पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादी तीन, तर कॉंग्रेस एक जागा लढवीत आहे. त्यानुसार, प्रारंभी चर्चा झालेली आहे. त्यानंतर दोन्ही पक्षांमध्ये चर्चा झालेली नाही. परंतु, पुणे स्तरावर दोन्ही पक्षांच्या नेत्यांची चर्चा झाली असेल तर मला माहिती नाही, असेही त्यांनी नमूद केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com