Loksabha 2019 : सुजय विखे पाटील नगरचे उमेदवार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 12 मार्च 2019

सुजय विखे पाटील म्हणाले, 'मला भाजप प्रवेशाबाबत घरातून विरोध झाला. त्याविरोधात जाऊन मला हा निर्णय घ्यावा लागला. वडिलांच्या इच्छेविरुध्द निर्णय घ्यावा लागला, त्यामुळे माझ्यावर खूप महत्त्वपूर्ण जबाबदारी आहे.'

काँग्रेसचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र सुजय विखे पाटील यांनी आज दुपारी अधिकृत भाजप प्रवेश केला आहे. नगरच्या विखेंची नवी पिढी भाजपमध्ये आली आहे. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश सोहळा रंगला. यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, बबनराव पाचपुते, राहुल कुल यांची प्रमुख उपस्थिती होती. मुंबईतील वानखेडे स्टेडियमच्या गरवारे क्लब हाऊसमध्ये हा सोहळा झाला.  
   
नगर लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीत राष्ट्रवादीकडे आहे. राष्ट्रवादीने हा मतदारसंघ काँग्रेसला सोडण्यास नकार दिल्यानंतर सुजय यांची नाराजी होती. म्हणून सुजय विखे पाटील यांनी समर्थकांसह भाजपच्या गोटात प्रवेश केला. 

या पक्ष प्रवेश सोहळ्यात सुजय म्हणाले, 'मला भाजप प्रवेशाबाबत घरातून विरोध झाला. त्याविरोधात जाऊन मला हा निर्णय घ्यावा लागला. वडिलांच्या इच्छेविरुध्द निर्णय घ्यावा लागला, त्यामुळे माझ्यावर खूप महत्त्वपूर्ण जबाबदारी आहे. माझ्याबाबत, माझ्या वडिलांबाबत अनेक चर्चा होत आहेत, होतील. पण भाजपबद्दलची भूमिका ही माझी वैयक्तिक भूमिका आहे.'

'आगामी आठ दिवसात महाराष्ट्रात अनेक राजकीय भूकंप होतील. 2019 ची लोकसभा निवडणूक ही फक्त भाजपच्याच नावे राहील. त्यामुळे इतरांनी 2024 ची तयारी करावी,' असे आवाहन महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी मांडलेले मुद्दे :
- सुजय विखे पाटील लोकसभेसाठी नगरचे उमेदवार
- नगरची जागा विक्रमी मतांनी निवडूण आणू
- नगर हा भाजपचा बालेकिल्ला असेल
- सुजय यांच्या रुपानं पक्षाला उमदं नेतृत्त्व
- मोदी यांनी देशाकडे तिरक्या नजरेने बघणाऱ्यांना धडा शिकवला. आपल्या तरुण जवानांनी ज्याप्रमाणे देशाचे नाव उंचावले तसेच सुजय विखे पाटील यांच्यासारखे तरुण करत असलेल्या आम्ही कामांना पाठींबा देतो.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sujay vikhe patil name announced for nagar candidate from BJP