Loksabha 2019 : लोकशाहीच्या उत्सवात ११.७० लाख मतदारांचा सहभाग

हरी तुगावकर
शुक्रवार, 19 एप्रिल 2019

  • लातूर लोकसभा मतदारसंघात ६२.१७ टक्के मतदान
  • काही ठिकाणी मशीन यंत्र बंद पडण्याचे प्रकार
  • जिल्हा प्रशासनाच्या वतीने मिशन डिस्टिंक्शन हा उपक्रम

लोकसभा 2019 
लातूर : लातूर लोकसभा मतदारसंघात गुरुवारी (ता. १८) मतदान झाले. लोकशाहीच्या या उत्सवात १८ लाख ८३ हजार ५३५ मतदारांपैकी ११ लाख ७० हजार ९४४ मतदारांनी मतदान करीत सहभाग घेतला. या मतदारसंघात ६२.१७ टक्के मतदान झाले आहे. २०१४ च्या निवडणुकीत या मतदारसंघात ६२.७३ टक्के मतदान झाले होते. या निवडणुकीत गेल्या वेळेसच्या तुलनेत कमी मतदान झाले आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीने मिशन डिस्टिंक्शन हा उपक्रम राबवला असला तरी मतदारात मात्र उत्साह दिसला नसल्याचे टक्केवारीवरून दिसत आहे.

या निवडणुकीत ज्येष्ठांसाठी सुविधा, चिमुकल्यांसाठी बालसंगोपन केंद्र, महिला कर्मचाऱ्यांच्या सहभागाने सखी तर दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या सहभागाने सक्षम मतदान केंद्र सर्वांना उत्सुक्तेचा विषय ठरला. अनेक मतदान केंद्रात रांगोळ्या काढून, फुलांनी सजवली गेली होती. त्यामुळे या लोकशाहीच्या उत्सवाला मंगलमय सोहळ्याचे स्वरुप प्राप्त झाले होते.
या मतदारसंघात दोन हजार ७५ मतदान केंद्रावर हे मतदान झाले. मशीन यंत्र बंद पडण्याचे तुरळक प्रकार वगळता मतदान शांततेत झाले.

या मतदार संघात ६२.१७ टक्के मतदान झाले आहे. यात सर्वाधिक ६५.६५ टक्के मतदान हे लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघात झाले. लातूर शहर विधानसभा मतदारसंघात ५७.३७ टक्के, अहमदूपर ६३.५२ टक्के, उदगीर ६१.४५ टक्के, निलंगा ६३ टक्के, लोहा मतदारसंघात ६.८३ टक्के मतदान झाले.

या मतदानात एकूण १८ लाख ८३ हजार ५३५ मतदारांपैकी ११ लाख ७० हजार ९४४ मतदारांनी मतदान केले. यात पुरुष मतदाराची संख्या सहा लाख २५ हजार ३३६ तर महिला मतदारांची संख्या पाच लाख ४५ हजार ६०५ इतकी होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: above 11 lakh voters votes in loksabha election 2019 in latur loksabha constituency