Loksabha 2019 : लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे 'अब तक छप्पन'; विनोद तावडे यांची टीका

हरी तुगावकर
शुक्रवार, 12 एप्रिल 2019

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लाटेत लोकसभा निवडणुकीत आपला निभाव लागणार नाही हे माहित असल्याने काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची ही निवडणूक लढवण्याची इच्छाच नव्हती. - शिक्षणमंत्री विनोद तावडे

लोकसभा 2019
लातूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात काँग्रेसने 56 पक्ष एकत्रित केले आहेत. हे सर्व 56 इंच छाती असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर टीकणार नाहीत. या निवडणुकीत काँग्रेसचे 'अब तक छप्पन' झाल्याशिवाय राहणार नाही, अशी टीका शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी येथे केली.

लातूर लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार सुधाकर शृंगारे यांच्या प्रचारार्थ मार्केट यार्डात शुक्रवारी (ता. 12) आयोजित जाहिर सभेत ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.  

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लाटेत लोकसभा निवडणुकीत आपला निभाव लागणार नाही हे माहित असल्याने काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची ही निवडणूक लढवण्याची इच्छाच नव्हती. पण त्यांचे हायकमांडने ऐकले नाही. आता तर काँग्रेसचे हे प्रदेशाध्यक्ष नांदेडपुरतेच मर्यादित राहिले आहेत. राज्यात ते कोठेच दिसत नाहीत, अशी टीकाही त्यांनी केली.
माढा मधून लढणार, पार्थ पवार निवडणूक लढणार नाहीत, अहमदनगरची जागा काँग्रेसला सोडणार असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले होते. पण ते बोलतात एक अन् करतात एक, अशी टीका श्री. तावडे यांनी यावेळी केली.

राहुल गांधी यांनी शेतकऱ्यांना 72 हजार रुपये देण्याचे जाहिर केले आहे. ते खरे बोलत असतील तर आमदार अमित देशमुख यांनी आता या मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या खात्यावर 50 हजार रुपये टाकावेत. राहुल गांधी यांनी पैसे दिल्यानंतर त्याचे 51 हजार रुपये परत करण्यात येतील, अशी उपरोधिक टीकाही श्री. तावडे यांनी केली.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Education Minister Vinod Tawde criticized congress in a public meeting in Latur