Loksabha 2019: औरंगाबादेत हर्षवर्धन जाधव यांची अपक्ष उमेदवारी दाखल

Loksabha 2019: औरंगाबादेत हर्षवर्धन जाधव यांची अपक्ष उमेदवारी दाखल

औरंगाबाद - औरंगाबाद लोकसभा निवडणुकीची अधिसूचना जारी होताच पहिल्या दिवशी गुरुवारी (ता. 28) 41 जणांनी 87 अर्ज घेतले. यामध्ये महायुतीचे उमेदवार चंद्रकांत खैरे 4, महाआघाडीचे उमेदवार सुभाष झांबड 4, तर आमदार हर्षवर्धन जाधव यांनी 1 अर्ज घेतला. विशेष म्हणजे आमदार जाधव यांनी पहिल्याच दिवशी आपला उमेदवारी अर्ज अपक्ष म्हणून दाखलही केला आहे. 

दहा मार्चला निवडणूक कार्यक्रमाची घोषणा झाल्यानंतर प्रशासन कामाला लागले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात लोकसभा निवडणुकीसाठी निवडणूक निर्वाचन अधिकाऱ्यांचे स्वतंत्र एक दालन सुरू करण्यात आले. गुरुवारी अधिसूचना जारी केल्यानंतर उमेदवारीचे अर्ज देण्यास सुरवात करण्यात आली. पहिल्या दिवशी 41 जणांनी आपापल्या उमेदवारांसाठी 87 अर्ज घेतले आहेत. यापैकी पहिल्या दिवशी आमदार जाधव यांनी एकट्यानेच आपला अर्ज दाखल केला. त्यांनी काही महिन्यांपूर्वीच शिवस्वराज्य बहुजन पक्षाची स्थापना केली. मात्र, उमेदवारी अर्ज भरताना अपक्ष म्हणूनच भरला आहे. चार एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख आहे. त्यानंतर 5 रोजी छाननी होईल. तर 8 एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. 

सध्या अनेकजण आपण मैदानात उतरणारच, अशी वल्गना करीत आहेत. असे असले तरी खरे चित्र नेमके किती जण मैदानात शिल्लक राहतील, हे आठ तारखेनंतरच स्पष्ट होणार आहे. 

गाजावाजा न करताच अर्ज दाखल 
मागील काही महिन्यांपासून कुठल्या ना कुठल्या कारणाने सतत चर्चेत राहणारे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी पहिल्याच दिवशी आपला अर्ज दाखल केला. यामुळे राजकीय क्षेत्रातील अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. कुठलाही डामडौल न करता अर्ज दाखल करून जाधव यांनी लक्ष वेधले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com