Loksabha 2019 : मोदींच्या हलगर्जीपणामुळेच पुलवामात 40 जवान हुतात्मा - प्रकाश आंबेडकर

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 8 एप्रिल 2019

देशाच्या संरक्षणाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींना गांभीर्य नाही. केवळ जवानांच्या शौर्याचा ते राजकीय वापर करतात. त्यांच्या हलगर्जीपणामुळेच पुलवामा हल्ला होऊन 40 जवान हुतात्मा झाल्याचा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी केला.

अंबाजोगाई/माजलगाव - देशाच्या संरक्षणाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींना गांभीर्य नाही. केवळ जवानांच्या शौर्याचा ते राजकीय वापर करतात. त्यांच्या हलगर्जीपणामुळेच पुलवामा हल्ला होऊन 40 जवान हुतात्मा झाल्याचा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी केला.

बीड लोकसभेचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रा. विष्णू जाधव यांच्या प्रचारार्थ रविवारी माजलगाव व अंबाजोगाईत सभा झाल्या. ऍड. आंबेडकर म्हणाले, 'भाजप धर्माचे राजकारण करीत आहे, "राष्ट्रवादी' धर्मनिरपेक्षतेचे ढोंग करीत आहे. आम्ही भांडवलदारांच्या ऐवजी सर्वसामान्यांना उमेदवारी देऊन लोकवर्गणीतून ही निवडणूक लढवत आहोत. मुस्लिमांसमोर वंचित आघाडी एक पर्याय आहे.''

2014 मध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या भाजप सरकारला राष्ट्रवादी कॉंग्रेसने का पाठिंबा जाहीर केला, याचे उत्तर आजही 'राष्ट्रवादी' देत नाही. निवडणुकीत धर्मनिरपेक्षतेचे ढोंग करणारी "राष्ट्रवादी' निवडणुकीनंतर भाजपमय होते, असा आरोप ऍड. आंबेडकर यांनी केला.

नोटाबंदी हा मोठा घोटाळा
नोटा हा रिझर्व्ह बॅंकेचा अधिकार असताना त्याची घोषणा नरेंद्र मोदींनी केली. नोटाबंदीने अर्थव्यवस्था बिघडून बेरोजगारी वाढली असून, यात मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोपही डॉ. आंबेडकरांनी केला.

Web Title: Loksabha Election 2019 Narendra Modi Pulwama Attack Prakash Ambedkar Politics