Loksabha 2019 : गडकरींच्या कार्यालयातून फोन येताच योगींची माघार

मंगेश शेवाळकर
गुरुवार, 28 मार्च 2019

लोकसभेच्या हिंगोली मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरण्याची तयारी करणाऱ्या माहूर येथील योगी श्‍याम भारती महाराज यांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयातून दूरध्वनी आला आणि त्यांनी माघार घेतली.

हिंगोली - लोकसभेच्या हिंगोली मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरण्याची तयारी करणाऱ्या माहूर येथील योगी श्‍याम भारती महाराज यांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयातून दूरध्वनी आला आणि त्यांनी माघार घेतली.

हिंगोली मतदारसंघातून भाजपतर्फे माहूर येथील योगी श्‍याम भारती महाराज यांनी निवडणूक लढविण्याच्या हालचाली सुरू केल्या होत्या. त्यासाठी त्यांनी मतदारसंघातील गावांत एक वर्षापासून संपर्कही वाढविला होता. विधानसभेच्या नांदेड, यवतमाळ मतदारसंघात गाठीभेटीनंतर त्यांनी हिंगोली, वसमत, सेनगाव मतदारसंघात भेटी देऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधला होता. योगी श्‍याम भारती महाराज यांच्या शिष्यांनीही त्यांना उमेदवारी दाखल करण्याची गळ घातली होती. त्यामुळे अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. त्यानंतर सोमवारी (ता. २५) रात्री उशिरापर्यंत त्यांच्यासमवेत शिष्यांच्या बैठकाही झाल्या होत्या. मात्र रात्री केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयातून दूरध्वनी आल्यानतंर योगी श्‍याम भारती महाराज यांनी आपला निर्णय बदलला. उमेदवारी अर्ज दाखल न करण्याचे ठरविले. याला योगी श्‍याम भारती महाराज यांनीही दुजोरा दिला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या कार्यालयातून दूरध्वनी आला होता. याशिवाय भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनीही युती असल्यामुळे युतीच्या उमेदवाराच्या पाठीशी राहण्याचे कळविल्याचे त्यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loksabha Election 2019 Nitin Gadkari Yogi Sham Bharati Maharaj Politics