Loksabha2019 : भाजपा-सेना एकाच माळेचे मनी : अॅड. प्रकाश आंबेडकर 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 8 एप्रिल 2019

नोटाबंदीचा अधिकार नसताना तो निर्णय घेतला. राफेल प्रकरणातील फायली गायब केल्या; अशा थापड्या, खोटारड्या सरकारला सत्तेपासून दूर ठेवलं तरच जनता सुखी समाधानी राहिल.

भोकर : यापूर्वी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या काळात भ्रष्टाचाराची मालिका सुरू झाली. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत आता भाजप सरकारही घोटाळ्यात अडकले आहे. नोटाबंदीचा अधिकार नसताना तो निर्णय घेतला. राफेल प्रकरणातील फायली गायब केल्या; अशा थापड्या, खोटारड्या सरकारला सत्तेपासून दूर ठेवलं तरच जनता सुखी समाधानी राहिल, असे मत वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांनी व्यक्त केले.

नांदेड लोकसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रा. यशपाल भिंगे यांच्या प्रचारासाठी शहरातील मोंढा प्रांगणातील जाहीर सभेत ते सोमवारी (ता.8) बोलत होते. यावेळी प्रा. यशपाल भिंगे, एमआयएमचे मराठवाडा अध्यक्ष फेरोज लाला, रामचंद्र भराडे, बाळू टिक्केर, वंचितचे जिल्हाध्यक्ष बाबूराव राठोड, नागोराव शेंडगे, भिमराव दुधारे, अॅड. सिद्धार्थ कदम, जुनेद पटेल, बाबाखान, सुनील कांबळे, सुभाष तेले, एल.ए.हिरे, भिमराव भंडारे व्यासपीठावर उपस्थित होते.

आंबेडकर म्हणाले, भाजप जनतेला भुलथापा देवून सत्ता हस्तगत करण्यात यशस्वी झाला आहे. प्रारंभी नोटाबंदीची घोषणा केली आणि स्वत:च त्याची पाठ थोपटवून घेतली. खरं तर हा अधिकार गव्हर्नरचा आहे. यातून देशातील अर्थव्यवस्था खीळ खीळी केली. त्यांच्या राज्यात शेतकरी आत्महत्या वाढल्या आहेत. येणाऱ्या काळात ते पुन्हा सत्तेवर आले तर देशातील व्यापाऱ्यांच्या आत्महत्या वाढतील. तेंव्हा व्यापाऱ्यांनी आत्ताच सावध भूमिका घेवून निर्णय घ्यावा. वंचित आघाडीला संधी द्या, त्याचं सोनं केल्याशिवाय राहणार नाही, असा विश्‍वासही आंबेडकर यांनी यावेळी दिला.

राजेश चंद्रे यांनी सुत्रसंचालन केले. दशरथ भदरगे यांनी आभार मानले.

‘‘प्रकाश आंबेडकरांनी जे वंचित आहेत अशा लोकांना न्याय दिला आहे. मी मेंढऱ्यांच्या - शेळ्यांच्या कळपातील आहे. विशेषत: आंबेडकरवादी आहे. म्हणून माळेगावच्या यात्रेतील कुस्तीच्या फडात मला साहेबांनी लंगोट बांधली. विरोधकांची अक्षरश: झोप उडाली आहे. आमच्या बहुजनाचे हेच खरे
जाणते राजे आहेत’’.
- यशपाल भिंगे (उमेदवार)

लाखो रुपयांची मदत
भोकर येथील जाहीर सभेत प्रकाश आंबेडकरांना प्रचारासाठी खर्च म्हणून जिल्ह्यातील विविध ठिकाणाहून आलेल्या नागरिकांनी स्वयंस्फुर्तीने लाखो रुपयांची मदत दिली. बऱ्याच विहार समिती आणि भीमजयंती मंडळांनी यात पुढाकार घेतला.

Web Title: Prakash Ambedkar criticizes BJP and Shivsne alliance in Nanded