LokSabha2019 : वाजपेयेंनी पण काय झोपा काढल्या का? : शरद पवार

Sharad Pawar
Sharad Pawar

उमरगा  :  पाच वर्षांत दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यात अपयशी ठरलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे विकासकामांचे मुद्दे नसल्याने 70 वर्षांच्या कामकाजावर टीका आणि विरोधकांवर हल्ले करण्याचा एक कलमी कार्यक्रम सुरू केला आहे. 70 वर्षांतील कालखंडात पाच वर्ष अटलबिहारी वाजपेयीही पंतप्रधान होते. मग त्यांनी झोपा काढल्या, असे मोदींना म्हणायचे आहे का? असा उपरोधात्मक प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी उपस्थित केला.

मते घेण्यासाठी सत्तेचा गैरवापर आणि धर्मांध भावना निर्माण करून राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाने सुरू केल्याची टीकाही त्यांनी केली. आम्ही कुणाची कळ काढत नाही, जर कुणी काढली तर त्यांना सोडत नाही, असा इशाराही पवार यांनी दिला.

उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील संयुक्त पुरोगामी आघाडीचे उमेदवार आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या प्रचारासाठी गुरुवारी (ता.4) उमरगा शहरातील गटशिक्षण कार्यालयासमोरील मैदानात आयोजित केलेल्या सभेत पवार बोलत होते. यावेळी माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील - चाकुरकर, आमदार बसवराज पाटील, मधुकरराव चव्हाण,  राहुल मोटे, विक्रम काळे, अशोक पाटील - निलंगेकर, नगराध्यक्ष प्रेमलता टोपगे, राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ, काँगेसचे जिल्हाध्यक्ष प्रशांत चेडे, जीवनराव गोरे, संजय कांबळे, जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष अर्चना पाटील, राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या सक्षणा सलगर, रामकृष्णपंत खरोसेकर, सुनील चव्हाण, जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्रा. सुरेश बिराजदार, अॅड. मल्हारी बनसोडे, अश्लेष मोरे, मकरंद सावे, राहुल पाटील, प्रकाश आष्टे, दिलीप भालेराव यांची उपास्थिती होती.

पवार म्हणाले,  नरेंद्र मोदी विकासकामांवर बोलण्यापेक्षा विरोधकांना लक्ष्य करून लोकांची दिशाभूल करीत आहेत. सत्तर वर्षाचां हिशोब मागताना मोदींना इतिहासाची जाणीव असायला हवी. केवळ गांधी, नेहरू घराण्यांवर टीका करण्यापेक्षा या कालखंडात पंडीत नेहरू, लालबहादुर शास्त्री, राजीव गांधी यांनी केलेल्या भरीव कामकाजाची माहितीही सांगायला हवी, लष्कारांनी जीवावर बेतुन हल्ले परतवण्याचे कर्तृत्व दाखविले, पण त्याचे मोदी राजकीय भांडवल करतात. भारतीय जवान कुलभूषण जाधव हे गेल्या तीन वर्षांपासून पाकिस्तानच्या कारागृहात आहेत. त्यांची सुटका होऊ शकली नाही. 56 इंची छातीचा बोलबाला करणाऱ्या मोदींची पंधरा इंची छाती कशी काय झाली, असा सवालही पवारांनी केला.

काश्मिरमध्ये दहशतवाद्याच्या हल्ल्यात हुतात्मा झालेले नाशिकचे जवान, व अभिनंदन यांच्या नातेवाईकांनी राजकीय भांडवल केले जात असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. आमच्या काळात हल्ले होऊ दिले नव्हते. झाले तर त्याचे भांडवल केले नाही. पाच वर्षांत जवळपास अडीच हजार हल्ले झाले असताना एक, दोन सर्जिकल स्टाईक करून त्याचा राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. परदेश दौऱ्यावर कोट्यावधी रुपयांचा खर्च करुनही जगातील देशांनी मदत केली नाही. 55 महिन्यांत 92 परदेश झाले, पण एक रुपयाचेही काला धन मिळाले नाही. उलट नोटाबंदीचा जुमला करून शेतकरी, कष्टकरांना रांगेत थांबविण्यात आले. कृषीमंत्री असताना आम्ही काही केले नसल्याच्या कांगावा केला जातोय, ज्यावेळी यवतमाळ जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या, त्यावेळी धोरणात बदल करत शेतकऱ्यांचे 70 हजार कोटी रुपयांचे एकरकमी कर्ज माफ केले.

फडणवीस सरकारच्या काळात दोन वर्षांत 11 हजार 998 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्यांनी शेतकऱ्यांसाठी काय दिवे लावले, असा प्रश्न कारून मागच्या साडेचार वर्षांत देशावर पावणेतीन लाखांचे कोटींचे कर्ज होते. आता ते 5 लाख 40 हजार कोटींवर गेले आहे. मोदींच्या काळात शेतकरी अडचणीत आला आहे, बहुतांश नागरिकांना आता वाईट प्रचिती येत आहे. मध्यप्रदेश, राजस्थानमध्ये भाजपच्या सत्ताधाऱ्यांना मतदारांनी खाली खेचले, तसाच प्रयोग महाराष्ट्रातुनही होऊन एक परिवर्तन घडवावे. उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात राणाजगजितसिंह पाटील यांच्या कर्तत्ववान नेतृत्वाला संधी द्यावी, असे आवाहन पवार यांनी केले. 

आमच्या शब्दाला मान द्या .... चाकूरकर
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसची विचारधारा, धोरणे जवळपास सारखीच आहेत. सत्तर वर्षांत काँग्रेस पक्षाने काहीच केले नसल्याचा अप्रचार केला जात आहे. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यापासून सर्व प्रांत एकत्र करण्यात काँग्रेसची भूमिका महत्वाची होती. अन्नधान्य वाढीसाठी झालेले प्रयत्न, आधुनिक तंत्रज्ञान निर्मिती, सरंक्षण विभागातील अत्याधुनिकता, शेतकऱ्यांसाठी महत्वाचे निर्णय झाले. आम्ही सैनिकांना जेवढी मान्यता दिली तेवढी अन्य कुणीही दिली नाही. सैनिकांच्या कामगिरीवर बडेजाव मारण्याचा प्रयत्न मात्र सत्ताधाऱ्याकडून केला जातोय. सध्याची निवडणूक महत्वाची आहे. मला सात वेळा लोकसभेत पाठविण्यासाठी उमरगा, लोहारा तालुक्यांचा बहुमोल वाटा होता. तोच वाटा राणाजगजितसिंह पाटील यांच्यासाठी द्यावा, नक्कीच त्यांच्या हातुन सकारात्मक काम होईल, अशी अपेक्षा व्यक्त करून चाकूरकर यांनी आमच्या शब्दाला मान द्या. असे आवाहन मतदारांना केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com