Loksabha 2019 : पोरं दुसऱ्यांना झाली, मांडीवर खेळवण्याची वेळ आमच्यावर- गडकरी

हरी तुगावकर
सोमवार, 15 एप्रिल 2019

पाण्याची समस्या ही काँग्रेस व राष्ट्रवादीचे पाप
सिंचनात मोठा भ्रष्टाचार
पंधरा वर्षापासून अनेक प्रकल्प बंद
प्रकल्प पूर्ण करण्यासाठी माझ्याकडून 40 हजार कोटी दिले

लातूर ः राज्यातील पाण्याची समस्या ही काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे पाप आहे. त्यांनी सिंचनात मोठा भ्रष्टाचार केला. पंधरा वर्षापासून अनेक प्रकल्प बंद पडली आहेत. हे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी माझ्या खात्याकडून 40 हजार कोटी रुपये दिले आहेत. लग्न भलत्याचच झालं. पोरं त्यांना झाली. या पोरांना मांडीवर बसवून खेळवण्याची जबबादारी मुख्यमंत्री फडणवीस व माझ्यावर आली. ही जबाबदारी आम्ही पार पाडत आहोत. म्हणूनच निधी दिला आहे. हा निधी म्हणजे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या आत्म्याला दिलेली श्रद्धांजली आहे अशी टीका केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज केली आहे. 

लातूर लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार सुधाकर शृंगारे यांच्या प्रचारार्थ सोमवारी (ता. 15) झालेल्या जाहिर सभेत ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर, खासदार डॉ. सुनील गायकवाड, माजी खासदार रुपाताई पाटील निलंगेकर, माजी खासदार डॉ. गोपाळराव पाटील, आमदार सुधाकर भालेराव उपस्थित होते.

गडकरी पुढे म्हणाले की, राज्यात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने सिंचनाची अर्धवट अवस्थेत स्मारके उभे केली आहेत. ही स्मारके पूर्ण करण्यासाठी पंतप्रधान सिंचन व बळीराजा योजनेतून 40 हजार कोटी रुपयांचा निधी दिला आहे. हा निधी म्हणजे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या आत्म्याला दिलेली श्रद्धांजली आहे, अशीही टीका त्यांनी यावेळी केली.

मराठवाड्याचा वाळवंट होत आहे. आम्ही आता नद्या जोड प्रकल्प हाती घेतला आहे. राज्यात दबडगंगा पिंजर आणि तापी नार नर्मदा हे दोन प्रकल्प हाती घेतले आहेत. पहिल्या प्रकल्पावर धरण बांधून त्यातील पाणी गोदावरील सोडले जाणार आहे. यातून ते जायकवाडी प्रकल्पात आणले जाईल. माझ्यावर विश्वास ठेवा मराठवाड्याचा पाण्याचा प्रश्न सोडवल्याशिवाय राहणार नाही. मराठवाड्याला वाळवंट नव्हे तर कॅलिफोर्निया केल्याशिवाय मी राहणार नाही, असा विश्वास श्री. गडकरी यांनी यावेळी लातूरकरांना दिला.

गेल्या साठ वर्षात जिल्ह्यात एकही राष्ट्रीय महामार्ग झाला नव्हता. आता नऊ हजार कोटी रुपये खर्च करून पाच राष्ट्रीय महामार्ग होत आहेत. पाणी ही जिल्ह्याची समस्या राहिली आहे. ती श्री. गडकरी यांनी सोडवावी. लातूर जिल्हा भारतीय जनता पक्षाच्या मागे उभा आहे, असा विश्वास पालकमंत्री निलंगेकर यांनी यावेळी दिला.
पूर्ण-तुगावकर

Web Title: Vote for Modi to make california of Marathwada