कार्यकर्ता मेळाव्यांकडे कॉंग्रेसने फिरवली पाठ 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 5 एप्रिल 2019

ठाणे लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीतर्फे रिंगणात उतरलेले आनंद परांजपे यांच्या प्रचारासाठी नवी मुंबईत कार्यकर्त्यांच्या होत असलेल्या मेळाव्यांकडे कॉंग्रेसने पाठ फिरवल्याने मतदारांमध्येही संभ्रम निर्माण झाला आहे.

नवी मुंबई - ठाणे लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीतर्फे रिंगणात उतरलेले आनंद परांजपे यांच्या प्रचारासाठी नवी मुंबईत कार्यकर्त्यांच्या होत असलेल्या मेळाव्यांकडे कॉंग्रेसने पाठ फिरवल्याने मतदारांमध्येही संभ्रम निर्माण झाला आहे. या मेळाव्यांत पक्षाला स्थान दिले नसल्याची तक्रार कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. ऐरोलीनंतर आता परांजपे यांच्यासाठी बेलापूर विधानसभा मतदारसंघात मेळावे आयोजित केले जात आहेत. 

शिवसेना-भाजप युतीतर्फे खासदार राजन विचारे यांच्या कार्यकर्त्यांचे जोरदार मेळावे होत आहेत आणि त्यात शिवसैनिकांसोबत भाजपचे कार्यकर्तेही सहभागी होत असल्यामुळे कार्यकर्त्यांच्या मोर्चेंबांधणीत युतीने आघाडी घेतल्याचे चित्र आहे. परंतु राष्ट्रवादीला अद्याप सूर गवसलेला नाही. परांजपे यांच्यासाठी नवी मुंबईत कार्यकर्ता मेळावे आयोजित करण्याची जबाबदारी नाईक घराण्याने घेतली आहे. मंगळवारी व बुधवारी सलग दोन दिवस नेरूळमध्ये मेळावे झाले. त्यात परांजपे यांच्यासोबत माजी खासदार संजीव नाईक, माजी महापौर सागर नाईक आदी उपस्थित होते; परंतु कॉंग्रेसचे नेते व पदाधिकारी नव्हते. फक्त राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हा मेळावा झाला. लोकसभा निवडणुकीत आघाडी असतानाही राष्ट्रवादी "एकला चलो रे'च्या भूमिकेत असल्यामुळे कॉंग्रेसचे नेतेही खासगीत नाराजी व्यक्त करतात. काही दिवसांपूर्वीच वाशीतील हॉटेलमध्ये कॉंग्रेसच्या नेत्यांचे गणेश नाईक यांच्या उपस्थितीत मनोमिलन झाले होते. त्यावेळी राष्ट्रवादीला पूर्णपणे मदत करण्यावर एकमत झाले होते. मात्र त्यानंतर आठवड्यातच नेरूळमध्ये झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात राष्ट्रवादीने कॉंग्रेसच्या नेत्यांना आमंत्रित केले नसल्याने कॉंग्रेसचे कार्यकर्तेही संभ्रमात आहेत. 

Web Title: Anand Paranjpe of NCP in the Thane Lok Sabha election