Loksabha 2019 : लोकशाहीचे रक्षण करणारे सरकार निवडा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 9 एप्रिल 2019

स्वातंत्र्यावर हल्ले झाले, तेव्हा लेखक- प्रकाशकांनी निषेध केला आहे; मग ते कुठलेही सरकार असो. माणसांच्या नागरी आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गेल्या पाच वर्षांत अत्यंत गळचेपी झाली, त्यामुळे लोकसभा निवडणुकीत नागरिकांनी मतदान करून भारताच्या सार्वभौम लोकशाहीचे रक्षण करणारे सरकार निवडावे, असे आवाहन मराठी लेखक, प्रकाशक, संपादकांनी केले आहे.

मुंबई - स्वातंत्र्यावर हल्ले झाले, तेव्हा लेखक- प्रकाशकांनी निषेध केला आहे; मग ते कुठलेही सरकार असो. माणसांच्या नागरी आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गेल्या पाच वर्षांत अत्यंत गळचेपी झाली, त्यामुळे लोकसभा निवडणुकीत नागरिकांनी मतदान करून भारताच्या सार्वभौम लोकशाहीचे रक्षण करणारे सरकार निवडावे, असे आवाहन मराठी लेखक, प्रकाशक, संपादकांनी केले आहे.

नागरी स्वातंत्र्य, व्यक्त होण्याच्या अधिकारावर मागील पाच वर्षांत सतत हल्ले होत आहेत. माणसांच्या निष्ठांवर संशय घेऊन राष्ट्रद्रोही ठरवले जात आहे; त्यांच्या मनात भीतीची भावना निर्माण केली जात आहे. या समाजविघातक प्रवृत्तींना आळा बसला पाहिजे. ठोस कृती करून त्यांचा निपटारा करण्याची आत्यंतिक गरज निर्माण झाली आहे. ही संधी सार्वत्रिक निवडणुकीच्या रूपाने राज्यघटनेने उपलब्ध करून दिलेली आहे, असे सुमारे 40 लेखक, प्रकाशक, संपादकांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रात म्हटले आहे.

या मान्यवरांत रामदास भटकळ, भालचंद्र नेमाडे, महेश एलकुंचवार, रत्नाकर मतकरी, सतीश आळेकर, रंगनाथ पठारे, श्‍याम मनोहर, वसंत आबाजी डहाके, प्रभा गणोरकर, नागनाथ कोत्तापल्ले, प्रेमानंद गज्वी, महेश केळुसकर, अतुल पेठे, अरुण शेवते, शफाअत खान, मनस्विनी लता रवींद्र, प्रणव सखदेव आदींचा समावेश आहे.

"राजकारण जाणून घेऊया'
आपल्या मनात दुसऱ्या धर्मांबद्दल, दुसऱ्या जातींबद्दल, दुसऱ्या माणसांबद्दल द्वेष निर्माण करणाऱ्या शक्ती कोणत्या आहेत ते ओळखूया, असे या पत्रकात नमूद करण्यात आले आहे. द्वेषभावनांना पोसणारे आणि हिंसक कृत्ये करून समाजात दहशत माजवणाऱ्या टोळ्यांना अभय देणारे राजकारणी कोण आहेत ते ओळखूया. जनतेच्या जीवन- मरणाच्या प्रश्‍नांना बगल देऊन राष्ट्रवादाचा फुगा फुगवण्यामागचे राजकारण जाणून घेऊया आणि अशा शक्तींना येत्या निवडणुकीत त्यांची जागा दाखवून देऊया. ती वेळ आता आली आहे, असेही या पत्रकात म्हटले आहे.

Web Title: Democracy Security Government Selection Writer Publisher Editor