Loksabha 2019 : पहिल्या सत्रात उत्साहाला उधाण

Loksabha 2019  :  पहिल्या सत्रात उत्साहाला उधाण

नवी मुंबई - मतदार याद्यांमध्ये नाव शोधणारे उत्साही नवमतदार, केंद्राच्या आवारात सेल्फी काढण्यात मग्न असलेले नागरिक, नटूनथटून जाऊन मतदान करणाऱ्या उत्साही महिला असे चित्र नवी मुंबईतील बहुतांश मतदान केंद्रांवर सोमवारी होते. सकाळच्या पहिल्या सत्रात नोकरदारांनी मतदानासाठी गर्दी केली होती. त्यामुळे पहिल्या सत्रातच ठिकठिकाणच्या केंद्रांवर रांगा होत्या. दुपारनंतर अनेक केंद्रांवरील गर्दी ओसरू लागली.

लोकसभा निवडणुकीसाठी नवी मुंबई पालिका क्षेत्रातील ऐरोली आणि बेलापूर विधानसभा मतदार संघात मतदान घेण्यात आले. आघाडीचे आनंद परांजपे आणि युतीचे राजन विचारे यांच्यात तुल्यबळ लढत होणार आहे. नवी मुंबईतील एकही प्रमुख उमेदवार नसल्याने प्रचारात फारसा वेग नव्हता. त्याच्या उलट चित्र मतदानाच्या वेळी होते. सकाळीच ८३८ केंद्रांवर मतदानाला सुरुवात झाली. त्यानंतर हळूहळू गर्दी वाढू लागली. नोकरदारांनी पहिल्या सत्रातच मतदान करण्यास पसंती दिल्याचे दिसत होते. त्यानंतर रिक्षातून आणि व्हीलचेअरवरून अपंग मतदारांना सावरणारे हात, मतदान केंद्रात आलेल्या ज्येष्ठ नागरिकांना घेण्यासाठी धावपळ करणारे कार्यकर्ते असे चित्र दिसत होते. सखी मतदान केंद्रात होणारे औक्षण असे वातावरणात या वेळी वेगळे ठरले.

काही ठिकाणी मतदार पावती न मिळाल्यामुळे केंद्रांबाहेर गोंधळ सुरू होता; मात्र मतदान प्रतिनिधींच्या मदतीने अशा व्यक्तींची नावे याद्यांमध्ये सापडल्यावर शांततेत मतदान झाले.

वाशी येथील केंद्रांवर दोन तास ईव्हीएम मशीन बंद पडल्याची तक्रार करण्यात आली होती, परंतु नंतर ती सुरू झाल्यानंतर मतदान सुरळीत झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

नेरूळ, जुईनगर, सानपाडा, वाशी या उपनगरांत मतदान यंत्रे संथगतीने कार्यरत होती. त्यामुळे मतदारांना अधिक काळ ताटकळत उभे राहावे लागले. याबाबत नेरूळमध्ये इंटक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र सावंत यांनी आक्षेप नोंदवत एक तास मतदानाकरिता वाढवून देण्याची मागणी केली. त्याची दखल घेत पोलिस आणि अधिकाऱ्यांनी मध्यस्थी करून मार्ग काढला.

लोकसभा निवडणुकीच्या घोषणेपासून प्रशासनातर्फे सुरू असलेल्या जनजागृतीला प्रतिसाद देत मोठ्या संख्येने नवमतदारांनीही अधिकार बजावला. मतदानानंतर सेल्फी काढण्याचा मोह त्यांना आवरता आला नाही. निवडणूक विभागातर्फे सखी मतदान केंद्रांवर मतदारांना औक्षण करून स्वागत केले. वाशी व ऐरोलीतील काही निवडक केंद्रांवर अशी व्यवस्था करण्यात आली होती. तसेच रस्त्यांवरही वाहनांची फारशी वर्दळ नसल्याने रस्ते मोकळे होते. माजी पालकमंत्री गणेश नाईक यांनी कुटुंबासह बोनकोडेतील केंद्रात मतदान केले. आमदार मंदा म्हात्रे यांनी बेलापूरमध्ये मतदानाचा अधिकार बजावला.

औक्षण करून महिला मतदारांचे स्वागत
w जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली बेलापूर लोकसभा मतदारसंघातील वाशी क्षेत्रात दोन ठिकाणी सखी मतदान केंद्र स्थापन करण्यात आली होती. केवळ महिला कर्मचाऱ्यांचीच नियुक्ती असलेल्या या वाशीतील सेक्रेट हार्ट स्कूल व मॉडर्न कॉलेजमधील मतदान केंद्रात येणाऱ्या महिला मतदारांना हळदी-कुंकू लावून त्यांचे औक्षण करून स्वागत करण्यात आले. या वेळी प्रत्येक केंद्रात २५ महिला कर्मचारी तसेच महिला बचत गटांनीदेखील स्वयंस्फूर्तीने सहभाग घेतला होता. विशेष म्हणजे सर्व महिला कर्मचारीवर्गाने पारंपरिक वेशभूषा करत मराठमोळे फेटे घातले होते. मतदान केल्यानंतर महिला मतदारांना गुलाब पुष्प व तुळशीचे रोपटे देण्यात आले. लोकांमध्ये मतदानाबाबत जागृती वाढावी व जास्तीत जास्त मतदान व्हावे, यासाठी ही संकल्पना राबवण्यात आली असल्याचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी रूपाली भालेक यांनी सांगितले.

‘आम्ही मतदान  कधी करायचं?’
अनेक केंद्रांवर निवडणूक कामासाठी उपस्थित असलेल्या काही कर्मचाऱ्यांना दुपारपर्यंत मतदान करण्याची संधी मिळाली नव्हती. एस. व्ही. कॉलेजमध्ये काही महिला कर्मचारी केंद्रावर उपस्थित वरिष्ठ कर्मचाऱ्यांशी वाद घालताना दिसत होत्या. आम्ही मतदान करण्यासाठी कधी जायचे? दिवसभर इथेच थांबायला सांगाल, तर आम्हाला मत द्यायला मिळणारच नाही. आम्हाला एकेकाला तरी मतदानासाठी सोडा, अशी विनंती करताना कर्मचारी दिसत होते. त्यावर वरिष्ठ कर्मचाऱ्याने, ‘तुमच्याकडे लेखी पत्र आहे का?’ अशी विचारणा त्या महिला कर्मचाऱ्यांना केली. ‘आम्हाला लेखी नाही; पण सरांनी मतदानासाठी तुम्ही जाऊन या,’ असे सांगितल्याचे महिला कर्मचारी सांगू लागल्या. त्यावर वरिष्ठ कर्मचाऱ्याने, ‘आता तुम्ही ऑनड्युटी आहात. तुम्हाला असे सोडणे शक्‍य नाही. आपण वरिष्ठांशी बोलू. त्यांनी सांगितले की लगेच तुम्हाला सोडू,’ असे सांगत त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला. 

अरेरे... राहूनच गेलं!
सीवूडस येथील डॉन बॉस्को शाळेतील एका बूथवर ईशा सावंत (वय १९, विद्यार्थिनी) ही पहिल्यांदाच मतदान करण्यासाठी हजर झाली होती. मत देऊन झाल्यानंतर तेथील कर्मचारी कामाच्या गडबडीत तिच्या बोटाला शाई लावण्यास विसरले. तिला तसेच बाहेर जाण्यास सांगितले जात होते. त्यावर तिनेच उपस्थित कर्मचाऱ्याला बोटाला शाई लावायची आठवण करून दिली. ती म्हणते, ‘मी पहिल्यांदाच मतदान करतेय. मी मत दिलेय, यावर शाई लावल्याशिवाय शिक्कामोर्तब कसे होणार? त्यामुळे मीच त्यांना आठवण करून दिल्यानंतर, ‘अरेरे राहूनच गेलं’ म्हणत त्यांनी माझ्या बोटाला शाई लावली.’

वाहनांवरून वाद 
मतदान केंद्रातच काही जण वाहने उभी करण्याचा प्रयत्न करीत होते. त्यामुळे अशा ठिकाणी १०० फूट लांब वाहने उभी करण्याचे आवाहन करताना अनेक ठिकाणी पोलिस दिसत होते. त्यामुळे काही ठिकाणी पोलिस आणि नागरिक यांच्यात वाद झाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com