Loksabha 2019 : कपिल पाटील यांचा विजय माझ्यासाठी महत्त्वाचा : एकनाथ शिंदे

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 15 एप्रिल 2019

कपिल पाटील यांच्याबरोबर शिवसैनिक कधीही दगाफटका करणार नाहीत. कार्यकर्त्यांनी पाटील यांच्या विजयाचे शिल्पकार व्हावे.

भिवंडी : पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी पुन्हा विराजमान होण्यासाठी महायुतीची प्रत्येक जागा महत्त्वाची आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली भिवंडी मतदारसंघात शिवसैनिक सक्रिय झाले असून जोरात प्रचार सुरू आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघापेक्षा मला भिवंडी मतदारसंघातील विजय महत्त्वाचा आहे, असे प्रतिपादन शिवसेनेचे नेते व पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी (ता. 13) भिवंडीमध्ये झालेल्या मेळाव्यात केले. समाजमाध्यमावर सुरू असलेल्या अपप्रचाराचाही शिंदे यांनी परखड शब्दांत समाचार घेतला. विष पेरणाऱ्या वृत्तीपासून कार्यकर्त्यांना सावध राहण्याचे आवाहन त्यांनी केले.

खासदार कपिल पाटील यांच्या प्रचारासाठी भिवंडीत शनिवारी महायुतीचा मेळावा पार पडला. या वेळी कपिल पाटील यांच्यासह, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील, आमदार रुपेश म्हात्रे, शांताराम मोरे, महेश चौगुले, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते कृष्णकांत कोंडलेकर, उपमहापौर मनोज काटेकर, तालुकाप्रमुख विश्‍वास थळे, शहरप्रमुख सुभाष माने, जिल्हाध्यक्ष दयानंद चोरघे, भाजप शहर अध्यक्ष संतोष शेट्टी, नगरसेवक सुमित पाटील, समाज कल्याण न्यासचे अध्यक्ष सोन्या पाटील, रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष बाळाराम गायकवाड, शहर अध्यक्ष महेंद्र गायकवाड, श्रमजीवी संघटनेचे सरचिटणीस बाळाराम भोईर आदी उपस्थित होते. श्रीकांत शिंदे यांच्या विजयासाठी शिवसैनिकांना दावणीला जुंपल्याच्या समाजमाध्यमावरील आरोपावर एकनाथ शिंदे यांनी जोरदार टीकास्त्र सोडले. "जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांच्या निधनानंतर मी शिवसैनिकांसाठी अखंड कार्यरत आहे. शिवसैनिक हे माझे कुटुंब आहे, असे समजून माझे काम सुरू आहे. कधीही स्वार्थी विचार केला नाही. आतापर्यंत ठाणे, भिवंडी आणि पालघर मतदारसंघांत सर्वाधिक बैठका घेतल्या. त्यात कल्याण मतदारसंघामध्ये दहा टक्के बैठकाही घेतल्या नाहीत. घरावर तुळशीपत्र ठेवून मी काम करीत आहे. शिवसैनिकांना कधीही कोणाच्याही दावणीला बांधणार नाही', असे शिंदे यांनी स्पष्ट केले.
 
कोणत्याही परिस्थितीत श्रीकांत शिंदे यांच्यापेक्षाही भिवंडीची जागा मला महत्त्वाची आहे. त्यादृष्टीने महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी कामाला लागावे. कपिल पाटील यांच्याबरोबर शिवसैनिक कधीही दगाफटका करणार नाहीत. कार्यकर्त्यांनी पाटील यांच्या विजयाचे शिल्पकार व्हावे, असे आवाहन शिंदे यांनी केले.
 
भिवंडी लोकसभा मतदारसंघात 28 हजार कोटींची कामे करण्यात आली. केवळ विकासाच्या मुद्द्यावर आपला प्रचार आहे, असे खासदार कपिल पाटील यांनी स्पष्ट केले. समाजमाध्यमावर माझ्याविरोधात अपप्रचार करण्यात आला. ते धादांत खोटे आहे. संबंधित घटना कधी व केव्हा घडली, याची कोणालाही माहिती नाही, असे खासदार कपिल पाटील म्हणाले. यापुढील सर्व निवडणुका महायुतीच्या माध्यमातूनच लढविल्या जातील, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. या मेळाव्याला महायुतीच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. 

बेडूक बैल होऊ शकतो का? 
समाजमाध्यमांवर पोस्ट टाकणाऱ्यांनी आधी अंतर्मनात बघायला हवे. सर्वच निवडणूक लढवायच्या आणि सर्वच जिंकायच्यात का, असा टोलाही एकनाथ शिंदे यांनी कोणाचेही नाव न घेता लगावला. महायुतीविरोधात काम करणाऱ्या कोणाचाही मुलाहिजा ठेवण्याची आवश्‍यकता नाही. शिवसेनेशी प्रतारणा करणाऱ्यांना महाराष्ट्राने धुळीला मिळविले, असे स्पष्ट करतानाच त्यांनी "बेडूक हा बैल होऊ शकतो का?' असा सवाल केला. बेडकाने आपल्या मर्यादेतच राहिले पाहिजे, असा टोलाही त्यांनी लगावला. 

अपप्रचारापासून सावध राहा 
समाजमाध्यमावर अपप्रचार करणारे फोटो व्हायरल केले जात आहेत. दिवंगत जिल्हाप्रमुख आनंद दिघे, मी आणि कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा एकत्रित फोटो तयार करण्यात आला होता. उद्या कॉंग्रेसवालेही माझा आतून पाठिंबा असल्याचे सांगतील. त्यामुळे अपप्रचारापासून कार्यकर्त्यांनी सावध राहावे, असे आवाहन एकनाथ शिंदे यांनी केले. 

Web Title: Kapil Patils victory is important to me says Eknath Shinde