Loksabha 2019 : उडाले ते कावळे, राहिले ते मावळे

Loksabha 2019 : उडाले ते कावळे, राहिले ते मावळे

‘उडाले ते कावळे, राहिले ते मावळे’ असे शिवसेनाप्रमुख (कै.) बाळासाहेब ठाकरे नेहमीच म्हणायचे. शिवसेनेची सत्ता गेल्यानंतर पक्षातून अनेक बडे नेते बाहेर पडले होते. त्यावरील ती प्रतिक्रिया होती. सत्तेचा महिमाच काही और असतो. त्यामुळे गुळाला मुंगळे चिकटल्याप्रमाणे ज्या पक्षाची सत्ता असेल त्याकडे आकर्षित होणाऱ्या नेत्यांची देशभरात काही कमी नाही.

पश्‍चिम महाराष्ट्राचा विचार केला तर बांधावर असलेल्या नेत्यांची संख्याही आता वाढू लागली आहे. त्यामुळे काही ठिकाणची समीकरणे बदलू लागण्याची दाट शक्‍यता आहे.
सोलापूर जिल्ह्यात गेल्या निवडणुकीत मोदी लाट होती. त्या वेळी ‘स्वाभिमानी’बरोबर भाजपची युती होती. त्याचा फायदा उठवण्यासाठी ‘राष्ट्रवादी’तून बाहेर पडलेले संजय शिंदे यांनी करमाळा येथून निवडणूक लढविली. त्यात अपयश आले. त्यांनी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत अपक्ष म्हणून विजय मिळविला. अध्यक्षपदासाठी भाजप, सेना, काँग्रेस अशा सर्वच पक्षांची मोट बांधून त्यांनी राज्यातील सत्ताधारी पक्षाचा लाभ घेतला.

माढ्याचे खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांना त्यांचा उघड विरोध आहे. आगामी निवडणुकीत या मतदारसंघातून ‘राष्ट्रवादी’कडून शरद पवार यांचे नाव उमेदवार म्हणून पुढे आल्यानंतर त्यांची मोठी अडचण झाली होती. पवार यांनी माढ्यातून माघार घेतल्याने आता परिचारक-शिंदे यांचा मार्ग मोकळा झाला आहे. भाजपचे सहयोगी सदस्य म्हणून परिचारक यांनी विधान परिषदेची निवडणूक लढवून विजयश्री खेचून आणली. राष्ट्रवादीचे वर्चस्व असतानाही दस्तुरखुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आशीर्वादामुळे त्यांच्या पदरी यश आले. मूळचे राष्ट्रवादीचे परिचारक यांनी सत्ताधीशांचा लाभ घेतला.

काही जण बांधावर
पुण्याचे राज्यसभा सदस्य संजय काकडे यांची परिस्थिती याहून वेगळी नाही. त्यांनी भाजपकडून सहयोगी म्हणून खासदारकी मिळवली. आता काँग्रेसचा `हात’ धरताहेत. पिंपरीचे आमदार लक्ष्मण जगताप यांना भाजपची आमदारकी मिळाली; सत्तेचा उपभोग घेतल्यानंतर ते पुन्हा ‘राष्ट्रवादी’च्या वाटेवर आहेत. ‘राष्ट्रवादी’चे माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनीही कमळ हाती घेतले आहे. जिल्हा परिषदेचे ‘राष्ट्रवादी’चे माजी उपाध्यक्ष सुरेश गोरे यांनी सेनेतून उमेदवारी मिळविण्यासाठी जिल्हा परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिला. आमदारकीच्या निवडणुकीत त्यांनी यश मिळविले. शरद पवार यांचे कट्टर समर्थक व राष्ट्रवादीचे नेते राहुल कुल यांना उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी गेल्या निवडणुकीत राष्ट्रीय समाज पक्षाची वाट धरली. ते निवडून आले. आता मात्र ते भाजपच्या वाटेवर आहेत.

इंदापूरचे ‘राष्ट्रवादी’चे आमदार दत्तात्रेय भरणे यांचे आणि माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे विळ्या भोपळ्याचे सख्य सर्वश्रुत आहे. आघाडीच्या जागावाटपात ही जागा काँग्रेसकडे राहील. त्यामुळे पाटील यांच्या पराभवासाठी रान पेटविणारे श्री. भरणे यांना पुन्हा नवा मार्ग शोधावा लागेल हे निश्‍चित!

कोल्हापूरचे ‘राष्ट्रवादी’चे खासदार धनंजय ऊर्फ मुन्ना महाडिक यांनीही भाजपच्या मित्रत्वाचा फायदा घेतला. यंदा काही वेगळा विचार करण्याआधी ‘राष्ट्रवादी’ने त्यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ घातली. खासदार उदयनराजे भोसले यांच्याही बाबतीत ‘राष्ट्रवादी’ने वेळेआधीच निर्णय घेतला. नाहीतर ही मंडळी बांधावर उभीच होती. प्रतापराव भोसले यांचे वारस मदन भोसले यांनी काँग्रेस पक्षाला राम-राम ठोकत भाजपमध्ये प्रवेश करून बांधावरून उडी घेतली. निवृत्त सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांना विरोध करण्यासाठी फलटण येथील सभेत `राष्ट्रवादी’चे शेखर गोरे यांनी शरद पवार यांच्या सभेतच बंडाचे निशाण फडकाविले. एकूणच निवडणुकीचे वातावरण तापू लागल्याने मावळे आणि कावळे कोण हे स्पष्ट होऊ लागले आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com