Loksabha 2019 : राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर कारवाई करण्याची मागणी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 8 एप्रिल 2019

  • राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरचे निरीक्षक अंकुश काकडे यांचे काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांना विनंतीपत्र 
  • राधाकृष्ण विखे पाटील यांच्या भूमिकेमुळे काँग्रेस पक्षाचे नगर जिल्ह्यातील काही कार्यकर्ते संभ्रमात

लोकसभा 2019
नगर : काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे नगर लोकसभा मतदारसंघातील उमदेवार संग्राम जगताप यांचा प्रचार करण्याऐवजी काँग्रेस पक्षाचे स्टार प्रचारक व विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील भाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांच्यासाठी प्रचारसभा घेत आहेत. त्यांच्यावर तातडीने कारवाई करण्यात यावी, अशी विनंती राष्ट्रवादीचे निरीक्षक तथा समन्वयक अंकुश काकडे यांनी काँग्रेस पक्षाच्या श्रेष्ठींकडे केली आहे. 

काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना त्या संदर्भात काकडे यांनी नुकतेच विनंतीपत्र पाठविले आहे. नगर लोकसभा मतदारसंघात विखे पाटील यांचे चिरंजीव डॉ. सुजय भाजपतर्फे निवडणूक लढवित असून ते निवडून येतील, असा उघड प्रचार विरोधी पक्षनेते विखे पाटील करत असल्याचा आरोप काकडे यांनी केला आहे. काँग्रेसचे नेते भाजपच्या उमेदवाराचा प्रचार करत असून, ही बाब गंभीर आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या भूमिकेमुळे काँग्रेस पक्षाचे नगर जिल्ह्यातील काही कार्यकर्ते संभ्रमात आहेत. त्याबाबत आपण काही कारवाई करणार आहोत की नाही?, असा सवालही काकडे यांनी उपस्थित केला आहे. 

डॉ. सुजय विखे पाटील यांनी अलिकडेच भाजपात प्रवेश केला. त्यावेळी नगर लोकसभा मतदारसंघात आता कुणाचाच प्रचार करणार नसल्याची भूमिका राधाकृष्ण विखे पाटील यांनी माध्यमांसमोर स्पष्ट केली होती. मात्र, त्यानंतर त्यांनी डॉ. सुजय यांच्यासाठी भाजपचे नाराज खासदार दिलीप गांधी व नगर लोकसभा मतदारसंघातील विखे गटाच्या काँग्रेस नेत्यांशी व सर्वपक्षीय पदाधिकारी-कार्यकर्त्यांच्या भेटी-गाठी घेऊन सुजय यांच्या प्रचारार्थ नियोजन सुरु केले. काल (ता. 7) पाथर्डी येथील सभेत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा थेट नामोल्लेख टाळून त्यांच्यावरही शरसंधान केले. याशिवाय जिल्हा परिषद अध्यक्ष असलेल्या राधाकृष्ण यांच्या पत्नी व डॉ. सुजय यांच्या मातोश्री शालिनी यांनीही पुत्राच्या प्रचारासाठी दौरा सुरु केला आहे. त्यामुळे अस्वस्थ झालेल्या राष्ट्रवादीचे निरीक्षक काकडे यांनी विखे पाटील यांच्याविषयी काँग्रेस पक्षाच्या अन्य वरिष्ठ नेत्यांकडे त्याबाबत तक्रार केली आहे. 

Web Title: The demand for action against Radhakrishna Vikhe Patil