Loksabha 2019: विजयदादा म्हणाले माढ्यातून उभारता का? त्यावर विजयकुमार म्हणाले...

Loksabha 2019: विजयदादा म्हणाले माढ्यातून उभारता का? त्यावर विजयकुमार म्हणाले...

सोलापूर - तुम्ही माढ्यातून लढणार आहात का? असा सवाल खासदार मोहिते-पाटील यांनी पालकमंत्री विजयकुमार देशमुखांना केला. माढ्यात माझं काय आहे? असं उत्तर देत...तो माझा मतदारसंघ नसल्याचे सांगून पालकमंत्री मोकळे झाले. मग माढ्यातून कोणते देशमुख लढणार आहेत? असा दुसरा सवाल खासदार मोहिते-पाटलांनी करताच पालकमंत्री देशमुखांनी नेहमीच्या स्टाइलने स्मित हास्य करून आपल्याला काहीच माहिती नसल्याचा भाव चेहऱ्यावर आणला. आजी-माजी पालकमंत्र्यांत रंगलेल्या या क्षणिक राजकीय जुगलबंदीने उपस्थितांत मात्र हशा पिकला.

सोलापूर आणि माढ्यातून भाजपतर्फे कोण लढणार? याची उत्सुकता जशी सर्वसामान्यांना आणि कार्यकर्त्यांना आहे, तशीच उस्तुकता नेत्यांनाही असल्याचे आज स्पष्ट झाले. निवडणुकीच्या तोंडावर आलेल्या लगीन सराईला हजेरी लावण्यासाठी सर्वपक्षीय नेते एकमेकांसमोर येतात. आज सोलापुरातील भाजप कार्यकर्ते राम व रोहिणी तडवळकर यांचे चिरंजीच प्रतीक यांच्या लग्न समारंभात पालकमंत्री विजयकुमार देशमुख आणि माढ्याचे खासदार विजयसिंह मोहिते-पाटील एकत्रित आले आणि त्यांच्यासह उमेदवारीची उत्सुकता कायम असल्याचे जाणवले. दोघांत झालेल्या संभाषणामुळे मात्र उपस्थितांना राजकीय जुगलबंदी पाहण्याची व ऐकण्याची संधी मिळाली. 

माढ्यातून लढण्याचे संकेत राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष खासदार शरद पवार यांनी दिल्याने त्यांच्या विरोधात भाजपचा उमेदवार कोण असेल? माढ्याची जागा मित्रपक्षाला सुटेल का? याबद्दल सोलापूरसह राज्यात कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. सोलापूरमधून लोकसभा लढण्यासाठी सुशीलकुमार शिंदे यांनी सर्व पद्धतीचा अभ्यास सुरू केला आहे. त्यांची तयारीही अंतिम टप्प्यात आली आहे. भाजप मात्र कोणाला संधी देणार? याची उत्सुकता अद्यापही कायम आहे. खासदार शरद बनसोडे व खासदार अमर साबळे वरिष्ठ स्तरावरून उमेदवारीसाठी प्रयत्न करत आहेत. 

सोलापूरसाठी पालकमंत्री देशमुख यांचा भक्कम पाठिंबा असल्याने गौडगावचे महाराज डॉ. जयसिद्धेश्‍वर महास्वामी निश्‍चिंत दिसत आहे. उमेदवारीची जनमत चाचणी आणि लग्नसमारंभाला उपस्थित राहात महास्वामींनी आता लोकसभेची राजकीय जुळवाजुळव सुरू केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com