Loksabha 2019 : संजय शिंदे माढ्यातून राष्ट्रवादीचे उमेदवार? 

Loksabha 2019 : संजय शिंदे माढ्यातून राष्ट्रवादीचे उमेदवार? 

सोलापूर - लोकसभा निवडणुकीसाठी माढा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आपले गुरू खासदार शरद पवार हे उभारणार असतील तर आपला समविचारी गट त्यांना मदत करेल. मात्र, त्यांच्या जागी मोहिते-पाटील कुटुंबातील उमेदवार असल्यास आपण उघडपणे विरोध करणार, असे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांनी श्री. पवार यांना सांगितले.

तत्पूर्वी, संजय शिंदे यांना भाजपने पवारांच्या विरोधात लोकसभा लढवा, त्या ठिकाणी पराभव झाल्यास विधान परिषदेवर घेऊ आणि राज्यमंत्रिपद देऊ असे आश्‍वासन दिले होते. परंतु, पवारसाहेबांमुळे त्यांनी ती ऑफर डावलल्याची चर्चा आहे. दरम्यान, आता पवारांनी माघार घेतल्याने संजयमामांची पवारनिष्ठा कामी येईल का, याची उत्सुकता आहे. 

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून राजकारणात आलेल्या संजयमामांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली. त्यानंतर त्यांना करमाळा विधानसभा निवडणुकीत पराभव पत्कारावा लागला. काही झाले तरी आता आमदार व्हायचेच, असा चंग बांधलेल्या संजयमामांनी मागील काही वर्षांत भाजपचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या मदतीने जिल्ह्यात समविचारी गट स्थापन केला. त्यामुळे खुद्द पवारांनी संजयमामांना भेटीचे निमंत्रण दिले आणि चर्चा केली.

दरम्यान, पालकमंत्री आणि सहकारमंत्री यांच्यातील वादामुळे सद्यःस्थितीत या गटाला महत्त्व प्राप्त झाले आहे. माढ्यातून सहकारमंत्री सुभाष देशमुखांना तिकीट मिळाल्यास हा समविचारी गट नेमका भाजपला मदत करणार की स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या मदतीने संजयमामा राष्ट्रवादीतून अथवा अन्य पक्षांतून स्वत:च लोकसभा लढविणार, असा तर्कवितर्क केला जात आहे. 

भाजपला बंडखोरीची भीती 
सोलापूर लोकसभेची निवडणूक 18 एप्रिलला, तर माढ्याची 23 एप्रिलला असून आचारसंहिताही लागली आहे. परंतु, उमेदवारांची नावे आताच जाहीर केली तर इच्छुक उमेदवार बंडखोरी करतील अथवा दुसऱ्या पक्षात जातील, या भीतीने भाजपने अद्यापही उमेदवार जाहीर केले नाहीत. सोलापुरातून गौडगाव मठाचे डॉ. जयसिद्धेश्‍वर महास्वामी यांची चर्चा असून त्यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख महेश कोठे यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी सुरू केल्याची चर्चा आहे. दुसरीकडे आपल्याला उमेदवारी न मिळाल्यास मी कोणत्याही पक्षात जाऊ शकतो, असा इशारा विद्यमान खासदार ऍड. शरद बनसोडे यांनी दिल्याची चर्चा आहे. त्यामुळे सोलापुरातून भाजपचा नेमका उमेदवार कोण, हे अद्यापही अनिश्‍चितच आहे. दुसरीकडे माढ्यातून कदाचित सहकारमंत्री सुभाष देशमुखांचा पराभव झाल्यास त्याचा परिणाम विधानसभेच्या निवडणुकीवर होईल आणि विजयी झाल्यास दक्षिण सोलापूर मतदारसंघावर शिवसेना हक्‍क सांगेल, अशी भीती व्यक्‍त होत आहे. या पार्श्‍वभूमीवर भाजपकडून माढ्याचा उमेदवार निश्‍चित करण्यासाठी विलंब लावला जात असल्याची चर्चा आहे. 

लोकसभा 2019

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com