Loksabha 2019 : ‘स्वाभिमानी’ महाआघाडीत; बेरजेचे राजकारण

Loksabha 2019 :  ‘स्वाभिमानी’ महाआघाडीत; बेरजेचे राजकारण

महाआघाडी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेतील गुरुवारी झालेल्या दिलजमाईमुळे गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असणाऱ्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. लढतीचे चित्र आता स्पष्ट झाले असून ‘स्वाभिमानी’ स्वबळावर लढल्यास संभाव्य उमेदवार कोण? असा पेच आघाडीसमोर होता, तर मतदारसंघातील बदलत्या घडोमाडी लक्षात घेता स्वाभिमानीलाही महाआघाडीचा आधार मोलाचा ठरणार आहे. या दिलजमाईमुळे काँग्रेस, राष्ट्रवादीचे नेते प्रथमच ‘स्वाभिमानी’च्या व्यासपीठावर दिसणार आहेत, तर खासदार शेट्टींच्या सहभागामुळे मराठवाडा आणि विदर्भातील उमेदवारांना बेरजेचे राजकारण करता येणार आहे. 

हातकणंगले, बुलढाणा आणि वर्ध्याच्या जागेवर स्वाभिमानी अडून होती; मात्र राष्ट्रवादीच्या यादीत बुलढाण्यातून राजेंद्र शिंगणे यांची उमेदवारी जाहीर केल्यामुळे ‘स्वाभिमानी’चे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांचा पत्ता कट झाला आहे, तर वर्ध्याच्या जागेवर माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते यांच्यासाठी स्वाभिमानी आग्रही आहे. 

अखेरच्या क्षणी स्वाभिमानी महाआघाडीत सामील होईल, अशी शक्‍यता वर्तविली जात होती. त्यादृष्टीने चर्चेचा प्रवाह सुरू होता. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही यामध्ये मध्यस्थी केल्याने याला दुजोरा मिळत होता. गुरुवारी याबाबतचा निर्णय झाल्याने हातकणंगले मतदारसंघातील लढतीचे चित्र स्पष्ट झाले. 

स्वाभिमानीकडून स्वबळाची भाषा सुरू झाल्यानंतर दोन्ही काँग्रेसमधील काही नेते मंडळींमध्ये धाकधूक सुरू होती. सद्यस्थितीत जिल्ह्यातील राजकीय परिस्थितीचा विचार करता स्वाभिमानीला बरोबर घेऊनच लढले पाहिजे, असा त्यांचा सूर होता. याबाबत वरिष्ठ नेत्यांकडेही गाऱ्हाणे मांडली होती. जिल्ह्याची परिपूर्ण महाआघाडी झाल्याने त्यांच्यात चैतन्याचे वातावरण आहे. जिल्ह्याच्या प्रत्येक भागात व खास करून ग्रामीण भागात स्वाभिमानीचे वलय असल्याने याचा महाआघाडीला फायदा होण्याची शक्‍यता आहे. 

या आधीच्या लोकसभेला काँग्रेसकडून स्वाभिमानीला मदत झाल्याचा आरोप या आधी करण्यात आला; मात्र यावेळच्या निवडणुकीत दोन्ही काँग्रेसच्या नेते मंडळींना खासदार शेट्टी यांच्या प्रचारात आघाडी घ्यावी लागणार आहे. शत्रूचा शत्रू आपला दोस्त हीच रणनीती महाआघाडीच्या माध्यमातून आखल्याचे स्पष्ट होते. 

समीकरणे बदलणार
भाजपचा वारू रोखण्यासाठीच दोन्ही काँग्रेस आणि स्वाभिमानीने हातात हात घेतला आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या राजकारणाची समीकरणे बदलणार असून अटीतटीच्या निवडणुकीचे हे संकेत मानले जात आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com