Loksabha 2019 : केंद्र सरकार सत्तेवरून खाली खेचा - उदयनराजे भोसले

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 11 एप्रिल 2019

महिलांना काम देणार
महिलांसाठी साताऱ्यात १०० कॉटचे सुसज्ज रुग्णालय साकारणार आहे. त्या माध्यमातून महिलांच्या आरोग्याची काळजी घेतली जाईल. औद्योगिक वसाहतीतील उद्योजकांच्या सहकार्याने महिलांच्या हाताला काम मिळावे, म्हणून निवडणुकीनंतर बैठक घेऊन विशेष कृती कार्यक्रम आखण्यात येईल, तसेच बचतगटांची चळवळ आणखी गतिमान व्हावी म्हणून प्रयत्न करू, अशी ग्वाही उदयनराजेंनी दिली.

सातारा - स्त्री समानता आणि महिला सक्षमीकरणाचा विचार शिवछत्रपतींनीच मांडला होता. तीच विचारधारा दोन्ही काँग्रेसने प्रत्यक्षात आणली. शिवरायांना अभिप्रेत असलेले स्वराज्य व देशासाठी बलिदान दिलेल्या स्वातंत्र्यसैनिकांचे हुतात्म्यांची जाणीव ठेवून हा देश प्रगतीपथावर न्यायला हवा. त्यासाठी काँग्रेस- राष्ट्रवादी व मित्र पक्ष आघाडीचे उमेदवार निवडून द्या. केंद्रातील सरकार सत्तेवरून खाली खेचा,’’ असे आवाहन उदयनराजे भोसले यांनी केले.

येथील कल्याण रिसॉर्टमधील महिला मेळाव्यात ते बोलत होते. आमदार शशिकांत शिंदे, सामाजिक कार्यकर्त्या ॲड. सुषमा अंधारे, सभापती वनिता गोरे, जयश्री गिरी, नगराध्यक्षा माधवी कदम, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा समिंद्रा जाधव, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा धनश्री महाडिक, जिल्हा परिषद सदस्या अर्चना रांजणे, अर्चना देशमुख, अनिता चोरगे, कमल जाधव, सुनीता कचरे, भाग्यश्री मोहिते आदी उपस्थित होत्या. 

शशिकांत शिंदे म्हणाले, ‘‘अन्यायी महासत्ता उलथवून टाकण्याची ताकद स्त्री शक्तीमध्येच असते. अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका, बचत गटातील महिला असा विविध स्तरातील महिला देशाला दिशा देतात.

त्यांच्याबाबत सकारात्मक कायदा व्हावा म्हणून माझ्यासोबत धनंजय मुंडे यांनी विधिमंडळात विशेष भूमिका घेतली होती. या निवडणुकीत सत्तांतर घडवण्यात आणि केंद्रातील हुकूमशहाला पायउतार करण्यासाठी महिलांनी आपला मताधिकार बजवावा.’’ 

ॲड. सुषमा अंधारे म्हणाल्या, ‘‘सर्वसामान्य जनतेत सहजपणे सामील होणारे उदयनराजे म्हणजे खऱ्याअर्थाने लोकनेते आहेत. बऱ्याचदा आमच्या भागात खासदार दाखवा आणि दहा हजार रुपये मिळवा, अशी पैज लावावी लागते. मात्र, उदयनराजेंचे वेगळेपण हीच त्यांची ओळख आहे. त्यांना पुन्हा संसदेत पाठवा.’’

उदयनराजेंचे आरोप
  मोदींना मतदानाची परतफेड अपकाराने केली
  जनतेला, मतदारांना पायाखाली चिरडून टाकले
  लोकशाही संपुष्टात आणण्याचा कुटील डाव सुरू
  दोन कोटी नोकऱ्यांचे आश्वासन वाऱ्यातच विरले

Web Title: Loksabha Election 2019 Central Government Udayanraje Bhosale Politics