Loksabha 2019 : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री खोटारडे - राज ठाकरे

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 एप्रिल 2019

राज ठाकरे म्हणाले...
- मोदी अन्‌ फडणवीसांनी मारलेल्या थापांचा हिशेब द्यावा
- थापाड्या सरकारला धडा शिकवा
- जाती-जातीत भांडण लावण्याचा सरकारचा प्रयत्न
- सरकारी क्षेत्रात मागील साडेचार वर्षांत राहिल्या केवळ 4-5 टक्‍के नोकऱ्या
- मराठी भाषिकांना खासगी क्षेत्रात नोकऱ्या द्या
- सरकारने जाहिरातींवर चार हजार 880 कोटी रुपये खर्च केले
- राज्यातील 28 हजार गावांमध्ये दुष्काळ
- हुतात्मा जवानांच्या नावे मतं मागायला पुलवामा घडवलंय का?

सोलापूर - राजीव गांधी यांच्यानंतर जनतेने 2014 मध्ये नरेंद्र मोदींनी दाखविलेल्या स्वप्नांवर विश्‍वास ठेवून त्यांना बहुमत दिले. मात्र, दिलेली आश्‍वासने अन्‌ दाखविलेल्या स्वप्नांवर मोदी आज काहीच बोलत नाहीत. आता हुतात्मा जवानांच्या नावावर मतं मागत ते फिरत आहेत.

दुसरीकडे शासकीय योजना फेल ठरूनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खोटं बोलत आहेत. सुशिक्षित तरुणांसह सर्वसामान्य जनतेचा विश्‍वासाने गळा कापणारा पंतप्रधान आणि खोटारडा मुख्यमंत्री आयुष्यात कधीच पाहिला नाही, अशी टीका राज ठाकरे यांनी केली.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक राज ठाकरे यांची सोमवारी कर्णिकनगर येथील मैदानावर सभा झाली. त्या वेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा खरपूस समाचार घेत देशाला मोदी व शहा मुक्‍त करण्याचे आवाहन उपस्थितांना केले. राज ठाकरे म्हणाले, की हरिसाल (जि. अमरावती) या पहिल्या डिजिटल व्हिलेजचे उद्‌घाटन पंतप्रधानांच्या हस्ते झाले. त्याची मोठी जाहिरात करून सरकार स्वत:चे कौतुक करून घेतले. वास्तविक गावाची अवस्था पहिल्यापेक्षा बिकट झाल्याचे पुरावे असतानाही फडणवीस खोटं बोलत आहेत. जाहिरात करणाऱ्या तरुणाने नोकरीच्या शोधात गाव सोडल्याचे ठाकरे म्हणाले. या वेळी राज ठाकरे यांनी सभेत जाहिरातीचा व्हिडिओ दाखविला आणि काही क्षणांतच त्या जाहिरातीतील तरुणाला हजर केले. त्या वेळी उपस्थितांनी "मोदी चौकीदार नहीं...चोर है...' अशा घोषणा दिल्या.

मोदी-शहांना हिटलरशाही आणायचीय
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना या देशात रशियाच्या धर्तीवर हुकूमशाही आणायची आहे. मोदी व शहा यांचे वर्तन हिटलरसारखे असून, त्यांना केंद्रात फक्‍त आठ-दहा व्यक्‍तींकडे सत्ता ठेवायची आणि कारभार चालवायचा आहे. देशातील जनतेची गळचेपी करण्याच्या दृष्टीने त्यांची पावले पडत असून, जनतेने वेळीच सावध होऊन मोदी अन्‌ शहामुक्‍त भारत करावा, असे आवाहन राज ठाकरे यांनी सभेत केले.

Web Title: Loksabha Election 2019 Chief Minister Wrong Raj Thackeray Politics