Loksabha 2019 : वादग्रस्त नेते प्रचारापासून लांबच

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 एप्रिल 2019

उमेदवारी न दिलेले प्रचारात दिसेनात
सोलापूरचे खासदार ॲड. शरद बनसोडे यांनी मतदारसंघात वेळ दिला नाही, विकासकामांकडे पाहिले नाही, अशी टीका मतदार करीत असल्याने त्यांना इच्छूक असूनही यंदा उमेदवारी दिली नाही. त्यामुळे नाराज झालेले खासदार डॉ. जयसिद्धेश्‍वर महास्वामींच्या प्रचारासाठी आलेच नाहीत. उस्मानाबादचे खासदार रवी गायकवाड यांनाही पक्षाने उमेदवारी नाकारल्याने त्यांनीही भाजप उमेदवाराच्या प्रचारापासून काढता पाय घेतल्याचे चित्र आहे.

सोलापूर - सत्तेत असताना मतदारांना चीड येईल, अशी वक्‍तव्ये केलेल्या, भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या आणि मागील साडेचार-पाच वर्षांत मतदारसंघात न फिरकलेल्या नेत्यांना भाजपने यंदा लोकसभेच्या निवडणूक प्रचारापासून चार हात लांबच ठेवल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. 

त्यामध्ये सहकारमंत्री सुभाष देशमुख, पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, खासदार ॲड. शरद बनसोडे, खासदार रवी गायकवाड, आमदार प्रशांत परिचारक यांचा प्रामुख्याने समावेश आहे.

नोटाबंदीच्या काळात पैसा सापडला, दूध भुकटी प्रकल्पासाठी अनुदान लाटले, शेतकऱ्यांच्या परस्पर त्यांच्या नावे कारखान्यासाठी कर्ज उचलणे, स्वत:च्याच कारखान्याची एफआरपी न देणे या कारणांमुळे व वादग्रस्त विधानांमुळे मागील साडेचार वर्षांत सहकारमंत्री सुभाष देशमुख सातत्याने चर्चेत राहिले. त्यामुळे राज्यातील महत्त्वाच्या खात्याचे मंत्री असतानाही त्यांना भाजपने प्रचार सभांना बोलावणे टाळल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. 

भाजपसमवेत सत्तेत असलेले राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांनी मी धनगर समाजाच्या जिवावर मंत्री झालो नाही, धनगर आरक्षण महत्त्वाचे नाही, अशी वादग्रस्त वक्‍तव्य केल्याने त्यांच्याविरुद्ध समाजात नाराजी आहे.

दुसरीकडे सदाभाऊ खोत यांनी मंत्रिपद मिळाल्यापासून शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवर बोलणेच टाळले, काहीच केले नाही, अशी टीका शेतकरी करीत आहेत. आमदार प्रशांत परिचारक यांनी सैनिकांबद्दल केलेल्या विधानांमुळे त्यांच्यावर टीका झाली. परिचारकांना प्रचारात कसे सामील करून घ्यायचे, असा पेच उमेदवारासमोर निर्माण झाला आहे.

Web Title: Loksabha Election 2019 Controversial leaders Publicity Politics