Loksabha 2019 : ‘सी-व्हिजिल’वर ४१ तक्रारी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 एप्रिल 2019

अंगणवाडीताई, तुम्हीसुद्धा?
निवडणुकांचा प्रचार जोर धरत असल्याने एक गठ्ठा मतदानांवर सर्वांचे लक्ष लागून आहे. त्यात अंगणवाडी सेविका, मदतनीस यांना लक्ष्य केले जात असल्याची चर्चा सातत्याने सुरू आहे. येथील एका सभेत चक्‍क अंगणवाडीताईंना समाविष्ठ करून शासकीय सेवकांचा दुरुपयोग केल्याची तक्रारही ‘सी-व्हिजिल’ ॲपवर झाली आहे. ही तक्रार संबंधित अधिकाऱ्यांकडे वर्ग करून त्याची शहानिशा करण्याच्या सूचना निवडणूक विभागाने दिल्या आहेत.

सातारा - ‘सी-व्हिजिल’ ॲप तक्रारदारांसाठी शस्त्रच बनले आहे. या ॲपद्वारे जिल्ह्यातून ४१ तक्रारी दाखल झाल्या असून, त्या तक्रारींची सत्यता पडताळून प्रशासनाने १९ तक्रारींवर कार्यवाही केली आहे. मात्र, २२ तक्रारींत तथ्य आढळून आले नसल्याचा दावा जिल्हा प्रशासनाचा आहे. तक्रारी होण्यात सातारा, कऱ्हाड दक्षिण, कोरेगाव हे विधानसभा मतदारसंघ आघाडीवर आहेत. 

केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीतील आचारसंहिता भंगाच्या तक्रारीच्या सोडवणुकीसाठी मतदारांना सिटिझन व्हिजिलन्स अंतर्गत ‘सी-व्हिजिल’ हे जीपीएस प्रणालीयुक्त मोबाईल ॲप्लिकेशन उपलब्ध केले आहे.

या लोकसभा निवडणुकीत प्रथमच मोबाईल ॲप्लिकेशन मतदारांना उपलब्ध झाले आहे. आचारसंहितेसोबत सुरू झालेल्या मोबाईल ॲप्लिकेशनवर ज्या तक्रारी येणार आहेत, त्यांची खातरजमा करून १०० मिनिटांत त्यावर कारवाईच्या निवडणूक आयोगाच्या सूचना आहेत. परिणामी तक्रार येताच तहसीलदार, तीन पोलिस, लिपिक, जाबजबाब घेणाऱ्या यंत्रणेसह भरारी पथकाचा लवाजमा घटनास्थळी जावून तेथील तक्रारीची तपासणी करतो. 
सी-व्हिजिल ॲपवर आतापर्यंत जिल्ह्यातून ४१ तक्रारी आल्या आहेत.

त्यामध्ये स्थिर पथकाद्वारे वाहनांची तपासणी करत नाहीत, नेत्यांच्या नावांचे, छायाचित्रांचे फलक खुले असल्याची, कोनशिला झाकल्या नसल्याचे, अंगणवाडी सेविकांचा सभांमध्ये गर्दी जमविण्यासाठी वापर केल्याच्या तक्रारींचा समावेश आहे. अशांवर कार्यवाही करण्यात आली आहे. तसेच येथील विसावा नाका येथे स्थिर पथकाद्वारे वाहनांची तपासणी केली जात नाही, सातारा पंचायत समितीमध्ये राजकीय नेत्याचे छायाचित्र असल्याची दिनदर्शिका आहे, मोर्चांची पत्रके भिंतीवर लावलेली आहेत, ‘कमळ’ चिन्ह ठिकठिकाणी आहे, अशा तक्रारी होत्या. विसावा नाका येथील स्थिर पथकांनी संबंधित दिवशी ४१ वाहनांची तपासणी केली. तसेच पंचायत समितीत दिनदर्शिका आढळून आली नाही, मोर्चाची पत्रके काढण्यात आली, तर ‘कमळ’चे चिन्ह झाकण्यात आल्याचे प्रशासनाने सांगितले.

Web Title: Loksabha Election 2019 CVIGIL Complaint