Loksabha 2019 : माढ्यात राजकीय धुळवड!

Loksabha 2019 : माढ्यात राजकीय धुळवड!

दहिवडी - देशभरात होळी व धुळवडीचा उत्साह सुरू असताना माढ्यात मात्र राजकीय धुळवडीने जोर धरला आहे. कोणत्या पक्षाची उमेदवारी कोणाला मिळणार, याबरोबरच शेवटपर्यंत नक्की कोण कोणाबरोबर राहणार, याचीच चर्चा रंगली आहे.

माढ्याचे मतदान तिसऱ्या टप्प्यात असल्यामुळे उमेदवारी अर्ज भरण्यास अजून आठवडाभर शिल्लक आहे. त्यातच उमेदवारीमुळे सुरू असलेला घोळ मिटता मिटेना झालाय. राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळत नाही, हे निश्‍चित झाल्यामुळे रणजितसिंह मोहिते-पाटील भाजपत डेरेदाखल झाले; पण त्यांनाच भाजपची उमेदवारी मिळेल, याची खात्री भाजपचे निष्ठावंत देत नाहीत.

राष्ट्रवादीकडून मैदानात कोण असणार, याची उत्सुकता शिगेला पोचली आहे. प्रभाकर देशमुख यांचे नाव आघाडीवर असले, तरी संजयमामा शिंदे यांच्या नावाबद्दलही चर्चा सुरू आहे. आज जाहीर होणार, उद्या जाहीर होणार म्हणत माढ्याची राष्ट्रवादीची उमेदवारी अजूनही जाहीर झालेली नाही. त्यातच आज अजित पवार यांनी माढ्यात राष्ट्रवादी नवा व तरुण उमेदवार देणार म्हणून संभ्रमात भरच घातली आहे.

भाजप व राष्ट्रवादीचा हा घोळ सुरू असतानाचा काँग्रेसच्या सुप्त इच्छांनी जोर धरला आहे. आमदार जयकुमार गोरे आपले सहकारी रणजितसिंह निंबाळकर यांना उमेदवारी मिळावी म्हणून प्रयत्नशील आहेत. पण, पडद्यामागे केलेल्या हालचाली तसेच कार्यकर्त्यांनी केलेली भाजपकडून लढण्याची मागणी यामुळे काँग्रेसला हा मतदारसंघ मिळावा, या मागणीत तितकासा जोर दिसत नाही.

पक्षांतराचे वारे वणवा बनून संपूर्ण महाराष्ट्रात पसरले असताना माढाही त्याला वंचित नाही. रणजितसिंह मोहिते-पाटील भाजपवासी झाले असताना त्यांचे चुलत बंधू धवलसिंह राष्ट्रवादीच्या वाटेवर आहेत. रणजितसिंह निंबाळकर व आमदार जयकुमार गोरे यांच्याही भाजपच्या नेत्यांसोबत बैठका सुरू आहेत, या चर्चेने जोर धरला आहे.

होळी पेटताच वातावरणातील गरमी वाढू लागली असतानाच माढ्यामधील राजकीय वातावरण कमालीचे तापू लागले आहे. माढ्यातील राजकीय धुळवड राज्यभर चांगलीच गाजणार, हे नक्की.

शेखर गोरे अजूनही संभ्रमात 
शरद पवारांच्या सभेत दंगा करून चर्चेत आलेले शेखर गोरे अजूनही संभ्रमात आहेत. त्यांनी अजून आपला निर्णय जाहीर केला नसल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे. शेखर गोरे यांनी निर्णय घ्यावा, अशी मागणी कार्यकर्ते करू लागले आहेत. नक्की काय करायचे, याबाबत कार्यकर्त्यांमध्ये एकवाक्‍यता दिसून येत नाही. शेखर गोरे यांनी निर्णय घ्यावा, आम्ही त्यांच्यासोबत आहोत, असे कार्यकर्ते म्हणत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com