Loksabha 2019 : मोदींची 17 एप्रिलला अकलूजमध्ये सभा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 8 एप्रिल 2019

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 17 एप्रिलला अकलूज (ता. माळशिरस) येथे सकाळी नऊ वाजता सभा होणार आहे. महायुतीचे माढ्याचे उमेदवार रणजितसिंह नाईक-निंबाळकर व सोलापूरचे उमेदवार डॉ. जयसिद्धेश्‍वर महास्वामी यांच्या प्रचारार्थ ही सभा होणार आहे.

सोलापूर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 17 एप्रिलला अकलूज (ता. माळशिरस) येथे सकाळी नऊ वाजता सभा होणार आहे. महायुतीचे माढ्याचे उमेदवार रणजितसिंह नाईक-निंबाळकर व सोलापूरचे उमेदवार डॉ. जयसिद्धेश्‍वर महास्वामी यांच्या प्रचारार्थ ही सभा होणार आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी जानेवारी महिन्यात मोदी सोलापूरच्या दौऱ्यावर आले होते. त्या वेळी विविध विकासकामांचे उद्‌घाटन त्यांच्या हस्ते झाले होते. त्यानंतर तीनच महिन्यांत मोदी पुन्हा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. या वेळी त्यांची सोलापूरला सभा होण्याची शक्‍यता धूसर आहे.

राज्याचे माजी उपमुख्यमंत्री खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांचे पुत्र माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. अकलूज येथे मोदी येणार असल्याने त्यांच्या उपस्थितीत खासदार विजयसिंह मोहिते-पाटील हे भाजपमध्ये प्रवेश करणार का? याबाबत तर्क-वितर्क सुरू आहेत. रणजितसिंह भाजपमध्ये गेल्यानंतर आपण त्या पक्षात गेलो नसल्याचे खासदार मोहिते-पाटील यांनी सांगितले होते. पण आता पंतप्रधानांच्या उपस्थितीत ते भाजपमध्ये प्रवेश करणार का? याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Web Title: Loksabha Election 2019 Narendra Modi Speech in Akluj Politics