साताऱ्यात  राजकारण उदयनराजेंभोवतीच!

साताऱ्यात  राजकारण उदयनराजेंभोवतीच!

सातारा मतदारसंघ राष्ट्रवादीचा बालेकिल्ला. २०१४ च्या मोदी लाटेतही भक्‍कमपणे टिकून राहिलेला. या मतदारसंघात खासदार उदयनराजे भोसले आणि त्यांचे बंधू आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यातला उभा राजकीय दावा जनतेने पाहिलेला आहे. राष्ट्रवादीचे जिल्ह्यातील आणखी एक प्रभावी नेते रामराजे नाईक-निंबाळकर यांच्याशीही मधल्या काळात उदयनराजेंबरोबर खटके उडाल्याचे सर्वश्रुत आहे. मध्यंतरी तर एका कार्यक्रमात आमदारांनी जाहीरपणे उदयनराजेंबाबतच्या तक्रारी पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्यापुढे मांडल्या होत्या. अशी स्थिती असतानाही लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सध्या सारे वातावरण शांत आहे. शिवेंद्रसिंहराजे आणि उदयनराजे यांच्यातील कथित मनोमिलनाचे वारे जोमाने वाहू लागले आहे. त्यासाठी शरद पवार स्वत: प्रयत्नशील आहेत. काही महिन्यांपूर्वी एकमेकांवर आरोप करणारे रामराजे आणि उदयनराजे यांनीही कानाला खडा लावलाय. राष्ट्रवादीचे उमेदवार उदयनराजे हेच असतील, असे संकेत पक्षाध्यक्षांनी दिले आहेत. 

राजघराण्यातील व्यक्‍ती म्हणून लोकांना उदयनराजेंबाबत आदर आहे. ही त्यांची जमेची बाजू लक्षात घेता राज्यातील सर्वच प्रमुख पक्ष त्यांना आपल्याकडे खेचण्याच्या प्रयत्नात आहेत. आजपर्यंत तरी ते कोणाच्या हाताला लागलेले नाहीत. सर्वपक्षीय नेत्यांशी चांगले संबंध ठेवत ते राष्ट्रवादीत आहेत. इकडे राष्ट्रवादीत पक्षांतर्गत मतभेद असूनही, उदयनराजेंना अव्हेरणे शक्‍य नाही आणि उदयनराजेंनाही भाजपसह सर्व पक्षांच्या ऑफर असूनही, ते राष्ट्रवादी सोडू शकत नाहीत, अशी स्थिती आहे. हा मतदारसंघ युतीच्या जागावाटपात शिवसेनेकडे आहे. त्यामुळे त्यांचा उमेदवार कोण, हा औत्सुक्‍याचा विषय आहे. २०१४ मधील अपक्ष उमेदवार पुरुषोत्तम जाधव सध्या भाजपमध्ये आहेत. तेदेखील निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. शिवाय नितीन बानुगडे पाटील यांचेही नाव शिवसेनेकडून चर्चेत आहे.

तात्पर्य काय, सध्यातरी सातारा मतदारसंघातील सर्वपक्षीय राजकारण उदयनराजेंभोवती फिरत आहे. त्यांच्या वलयाची ही किमया असेल; पण ते विकासासाठीही वापरावे, या सर्वसामान्यांच्या अपेक्षेचे काय, हा प्रश्‍न दहा वर्षांत अनुत्तरितच आहे. 

चित्र मतदारसंघाचे
औद्योगिक वसाहतींत मोठे उद्योग येणे गरजेचे
सिंचनाचे अनेक प्रकल्प अद्याप अर्धवट
सातारा-मिरज रेल्वे विस्तारीकरण भूसंपादनात अडकले

२०१४ चे मतविभाजन
उदयनराजे भोसले (राष्ट्रवादी) - ५,२२,५३१ (विजयी)
पुरुषोत्तम जाधव (अपक्ष) - १,५५,९३७
अशोक गायकवाड (रिपब्लिकन पक्ष) - ७१,८०८ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com