Loksabha 2019 : साताऱ्यातही ‘आमचं ठरलंय’ची धूम!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 एप्रिल 2019

चिन्हांपेक्षा ‘मिशी’ व ‘कॉलर’चीच चर्चा 
कोणतीही निवडणूक म्हटले की, उमेदवाराचे चिन्ह आले. उमेदवारापेक्षा त्याच्या चिन्हाचा प्रचार अधिक केला जातो. मात्र, सातारा लोकसभा मतदारसंघात सध्या उमेदवारांच्या चिन्हापेक्षा ‘मिशी’ व ‘कॉलर’चाच प्रचार अधिक होताना दिसत आहे. त्यामुळे उमेदवाराचे नाव व त्याचे चिन्ह यापेक्षा ‘मिशी’ व ‘कॉलर’ ही नवी ओळख पुढे येऊ लागली आहे.

कऱ्हाड - कोल्हापूरपाठोपाठ सातारा लोकसभा मतदारसंघातही ‘आमचं ठरलंय’ हे वाक्‍य चांगलेच चर्चेत येऊ लागले आहे. सोशल मीडियावर शिवसेनेच्या उमेदवारांचे नाव, चिन्हाऐवजी मिशीचा लोगो व त्यात ‘आमचं ठरलंय’ हे वाक्‍य सर्वांचे लक्ष वेधून घेत असतानाच खासदार उदयनराजे समर्थकांकडून मिशीची खिल्ली उडवत त्यास प्रत्युत्तर दिले जात आहे. त्यातही ‘आमचं ठरलंय’ हा मजकूरही आहे. 

सातारा लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोचला आहे. दोन्ही उमेदवारांच्या आरोप-प्रत्यारोप, आव्हान-प्रतिआव्हानामुळे प्रचार रंगतदार अवस्थेत पोचला आहे. त्यातच सोशल माध्यमावरही दोन्ही उमेदवारांचे समर्थकांची प्रचाराची जुगलबंदी रंगत आहे. कालपासून सोशल मीडियावर पिळदार मिशी व त्यात ‘आमचं ठरलंय’ हे वाक्‍य लिहून समर्थकांनी नवा ट्रेंड आणला आहे. कोल्हापूरमध्ये काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी आघाडी धर्म न पाळता शिवसेनेचे उमेदवार संजय महाडिक यांना सहकार्य करताना ‘आमचं ठरलंय’ असे कोल्हापुरात लागलेले फलक राज्यात चर्चेचे ठरले.

‘आमचं ठरलंय’ची दखल घेताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही कोल्हापूर मतदारसंघातील एका सभेत ‘तुमचं ठरलंय..., तर आमी बी ध्यानात ठेवलंय’ हे विधान उच्चारले. त्यामुळे राज्यभर पोचलेले ‘आमचं ठरलंय’ हे वाक्‍य आता सातारा लोकसभा मतदारसंघातही चर्चेत येत आहे.

राष्ट्रवादीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्याबद्दल कऱ्हाड, पाटण मतदारसंघात असलेल्या नाराजीचा फटका बसताना ‘आमचं ठरलंय’चा नारा या भागातील कार्येकर्ते देताना दिसताहेत. त्यातून कार्यकर्त्यांची चांगलीच जुंपताना दिसते. त्याला प्रत्युत्तर देताना खासदार भोसले समर्थकांनी त्याच पोस्टमध्ये मिशीची खिल्ली उडवताना ‘आमचं ठरलंय’ हे वाक्‍यही त्यामध्ये टाकले आहे. त्यामुळे या अनोख्या ट्रेंडची सध्या सोशल मीडियात चांगलीच चर्चा आहे.

Web Title: Loksabha Election 2019 Satara Constituency Politics Shivsena Congress