Loksabha 2019 : शेखर गोरे भेदणार चक्रव्यूह?

Shekhar-Gore
Shekhar-Gore

सातारा - पक्षाकडून कामाची दखल न घेतल्याने शेखर गोरेंनी भाजपसोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे. माढा लोकसभेच्या निवडणुकीत याचा परिणामही दिसेल. पण, राष्ट्रवादीला हात दाखवून कमळाच्या प्रेमात जाणाऱ्या शेखर गोरेंनाही आगामी विधानसभा निवडणुकीत तब्बल तीन पक्षांशी दोन हात करावे लागतील. त्यामुळे शेखर गोरेंची अवस्था चक्रव्यूहात सापडलेल्या अभिमन्यूसारखी होण्याची शक्‍यता राजकीय वर्तुळात व्यक्‍त होत आहे.

विधान परिषदेच्या निवडणुकीतील पैसे वाटपावरून राष्ट्रवादीच्या नेत्यांवर गोरेंनी केलेल्या आरोपांमुळे सर्वांची गोची होणार असतानाच, माणमधील शेखर गोरेंच्या ताकदीची वजाबाकी राष्ट्रवादीला महागात पडणार की काय? हे पाहणे औत्सुक्‍याचे ठरणार आहे. 

शेखर गोरेंनी २०१४ ची विधानसभा निवडणूक राष्ट्रीय समाज पक्षातून लढविली. त्यावेळी जयकुमार गोरेंच्याविरोधात त्यांना ५२ हजार ३५७ मते मिळाली होती.

त्यांची माण तालुक्‍यातील ताकद पाहून राष्ट्रवादीच्या जिल्ह्यातील नेत्यांनी त्यांना राष्ट्रवादीत घेतले. त्याच दरम्यान विधान परिषदेची निवडणूक झाली. पण, पक्षाकडे अधिक मते असूनही शेखर गोरेंचा पराभव झाला. त्याची सल शेखर गोरेंच्या मनात आजही आहे. त्यानंतरही त्यांना पक्षाने फारसे विचारात घेतले नाही. त्यांच्याऐवजी माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांना ताकद देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे श्री.गोरे अधिकच भडकले व त्यांच्यासह त्यांच्या समर्थकांचा उद्रेक फलटणच्या शरद पवारांच्या सभेत झाला. श्री. पवार यांच्या ५० वर्षांच्या राजकारणात त्यांच्या जाहीर सभेत कधीच कोणी गोंधळ घातला नव्हता. पण, शेखर गोरेंच्या समर्थकांनी केलेल्या प्रकारामुळे राष्ट्रवादीचे सर्वच नेते नाराज झाले. यावरही शेखर गोरेंची समजूत काढण्याचा प्रयत्न विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी केला. पण, शेखर गोरेंनी त्यांना फारशी दाद दिली नाही. आता त्यांनी राष्ट्रवादी व त्यांच्या नेत्यांवर आरोप करत भाजपसोबत राहण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचा राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या मताधिक्‍यावर नक्की परिणाम होणार आहे. पण, शेखर गोरेंची नेमकी ताकद किती, असा प्रश्‍न माणमधील काही नेतेमंडळी उपस्थित करत आहेत. 

राष्ट्रवादीचे माणमध्ये निवडून आलेले सदस्य शेखर गोरेंसोबत राहणार की पक्षासोबत? हा प्रश्‍न महत्त्वाचा आहे.  माण तालुक्‍यात त्यांनी स्वत:च्या हिंमतीवर राष्ट्रवादीची ताकद निर्माण केली आहे. सध्या राष्ट्रवादीकडे तीन जिल्हा परिषद सदस्य, तीन पंचायत समिती सदस्य, म्हसवड नगरपंचायत आणि दहिवडी नगरपंचायतीत पाच सदस्य अशी ताकद आहे. ही ताकद पोळ गट आणि शेखर गोरेंची ताकद मिळून आहे. त्यामुळे शेखर गोरेंना गमवणे राष्ट्रवादीला अडचणीचे ठरणार आहे. राष्ट्रवादीत जुन्यांना बाजूला ठेवून नव्यांना पुढे आणण्याचा प्रकार होत असतो. याचा फटका शेखर गोरेंना बसला आहे. आता विधानसभेच्या निवडणुकीत ते अपक्ष उभे राहणार असल्याचे सांगत आहेत. तसे झाले तर त्यांच्या विरोधात काँग्रेस, राष्ट्रीय समाज पक्ष, भाजप-शिवसेना, राष्ट्रवादी असे उमेदवार असतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com