Loksabha 2019 : सत्ताकारणे उदयनराजेंचे बदलते तराणे...

Udayanraje-Bhosale
Udayanraje-Bhosale

सातारा - पक्ष गेला खड्ड्यात म्हणणारे व विरोधकांच्या व्यासपीठावरच वारंवार दिसणारे खासदार उदयनराजे भोसले आता राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांना निवडून आणण्याची कमिटमेंट देत आहेत. उदयनराजेंचा बदललेला हा ट्रेंड सातारकरांच्या कुतूहलाचा विषय बनला आहे. मात्र, याच पद्धतीची खूणगाठ कायम राखली तरच ते स्वत: व पक्षही जिल्ह्यात भक्कम होऊ शकतो.

राष्ट्रवादीचे बंडखोर खासदार, अशी उदयनराजेंची देशभर ख्याती. पक्षात राहूनच पक्षावर टीका करण्याची, स्थानिक आमदारांच्या विरोधकांना चुचकारण्याची, विरोधकांच्या व्यासपीठावर स्तुतीसुमने उधळण्याची एकही संधी उदयनराजेंनी गेल्या दहा वर्षांत सोडली नाही. त्यांच्या या भूमिकेमुळे जिल्ह्यातील पक्षाच्या अन्य नेतृत्वांची नेहमी कोंडी झाली. जिल्हा परिषद, जिल्हा बॅंक, विधान परिषद, आमदारकी वा अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अनेकदा उदयनराजेंनी एक तर सवतासुभा मांडला किंवा विरोधकांना मदत केली. त्यामुळे राष्ट्रवादीअंतर्गत त्यांच्याविरोधात मोठी अस्वस्थता निर्माण झाली होती. 

साताऱ्यातील तथाकथित मनोमिलन तुटल्यानंतर त्याला चांगलीच धार आली. मागील वर्षी उदयनराजेंच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात ही अस्वस्थता सार्वजनिक झाली. सर्व आमदार व पदाधिकाऱ्यांनी उदयनराजेंच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला. तेथून उदयनराजेंच्या कुरापतींना जाहीर विरोध सुरू झाला. याबाबत सर्वांनी पक्षाध्यक्ष शरद पवार यांना भेटूनही गाऱ्हाणी मांडली. त्यानंतर शिवेंद्रसिंहराजे समर्थकांनी बंडाचा झेंडा खांद्यावर घेत पक्षाध्यक्षांची भेट घेतली. आमदारांनी सांगितले तरी, त्यांचे काम करणार नाही, असा पवित्रा सर्वांनी घेतला.

या सर्व परिस्थितीवर मात करण्यासाठी शरद पवार यांनी अनेकदा पुढाकार घेतला. दोघांना गाडीत घेऊन एकीचा संदेश देण्याचाही प्रयत्न केला. त्याच कार्यक्रमात त्यांनी उदयनराजेंना डोके शांत ठेवण्याचा सल्ला दिला होता. एवढ्यावरच न थांबता त्यांनी नुकतीच सर्व आमदार व उदयनराजेंची एकत्रित बैठक घेऊन पक्ष सांधण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर प्रचारात सक्रिय झालेल्या उदयनराजेंच्या वर्तनावरून व भाषणांमधून पक्षाध्यक्षांची मात्रा त्यांना लागू पडल्याचे दिसत आहे. 

मुंबईतील सभेत शिवेंद्रसिंहराजे भोसले व मी एकाच नाण्याच्या बाजू असल्याचे वक्तव्य, त्यानंतर साताऱ्यातील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात मतभेद विसरल्याशिवाय पुढे जाता येणार नसल्याचे केलेले आवाहन आणि राष्ट्रवादीचे सर्व आमदार निवडून आणण्याची घेतलेली कमिटमेंट या सर्वांवरून त्यांनी स्वत:त बदल करून घेतल्याचे स्पष्ट होत आहे.

बदल कायमस्वरूपी हवा
बदलाचा त्यांना नक्कीच फायदा होईल. परंतु, हा बदल कायमस्वरूपी असावा, अशी सर्वांची अपेक्षा आहे. निवडणुका जवळ आल्यानंतर राजकारण्यांच्या वर्तनात होत असलेल्या बदलाचाच तो एक भाग नसावा. पक्षाच्या ध्येय-धोरणांना अनुकूल व जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व नेत्यांच्या विचारातून झालेली कृतीच सर्वांसाठी अनुकूल ठरणार आहे. त्यातूनच पक्ष भक्कम होऊ शकतो. पण, दगडाखालचा हात निसटल्यानंतर दुसराच पवित्रा आढळला तर, नंतरच्या काळात सर्वांची मोट बांधणे उदयनराजेंना नक्कीच जिकिरीचे ठरू शकते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com