Loksabha 2019 : वादाची होळी की, बदल्याची धुळवड...

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 15 मार्च 2019

सातारा - सातारा लोकसभेचा राष्ट्रवादीचा उमेदवार निश्‍चित झाला तरी अद्याप सातारा विधानसभा मतदारसंघात दोन राजांमधील वाद कायम असल्याचे दिसते. पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या सूचनेनंतरही दोन्ही राजांमधील समर्थकांची समजूत काढलेली नाही. तर उदयनराजेंनी सातारा तालुका व शहरातील त्यांच्या समर्थकांची स्वतंत्र बैठक घेऊन नियोजनावर भर दिला आहे. त्यामुळे दोन्ही राजे एकत्र बसून वादाची होळी करणार की, त्यांचे समर्थक एकमेकांप्रती बदल्याची भावना ठेवणारी धुळवड करणार, हे पाहणे औत्सुक्‍याचे ठरणार आहे.

सातारा - सातारा लोकसभेचा राष्ट्रवादीचा उमेदवार निश्‍चित झाला तरी अद्याप सातारा विधानसभा मतदारसंघात दोन राजांमधील वाद कायम असल्याचे दिसते. पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या सूचनेनंतरही दोन्ही राजांमधील समर्थकांची समजूत काढलेली नाही. तर उदयनराजेंनी सातारा तालुका व शहरातील त्यांच्या समर्थकांची स्वतंत्र बैठक घेऊन नियोजनावर भर दिला आहे. त्यामुळे दोन्ही राजे एकत्र बसून वादाची होळी करणार की, त्यांचे समर्थक एकमेकांप्रती बदल्याची भावना ठेवणारी धुळवड करणार, हे पाहणे औत्सुक्‍याचे ठरणार आहे.

आमदार शिवेंद्रसिंहराजे व त्यांच्या समर्थकांच्या विरोधानंतरही राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाचे कारण पुढे करत उदयनराजेंना तिसऱ्यांदा साताऱ्यातून उमेदवारी दिली. तसेच दोन्ही राजांनी एकमेकांसोबत बसून वादावर तोडगा काढावा आणि आपापल्या कार्यकर्त्यांची समजूत काढावी, अशी सूचना केली होती. सातारा व जावळीतील राष्ट्रवादी व काँग्रेसचे कार्यकर्ते आजही आघाडीच्या उमेदवारासोबत आहेत, असे सांगत आहेत. पण, आमदारांचे सातारा तालुका व शहरातील समर्थक आजही उदयनराजेंशी जुळवून घेण्याच्या मनस्थितीत नाहीत. त्यामुळे ऐन निवडणुकीत सातारा व जावळीत राष्ट्रवादीअंतर्गत वाद उफाळून येण्याचे चित्र आहे. 

गाठीभेटींवर भर...
उदयनराजेंची उमेदवारी निश्‍चित झाल्यानंतर त्यांनी सातारा लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील आघाडीच्या नेत्यांशी थेट संपर्क करण्यावर भर दिला आहे. त्यामुळे माजी खासदारांपासून सर्व आमदारांशी त्यांनी थेट भेट घेऊन त्या त्या मतदारसंघात प्रचाराच्या नियोजनावर चर्चा केली आहे. पण, त्यांनी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याशी मात्र चर्चा केलेली नाही. तर शरद पवार यांच्या सूचनेनुसार शिवेंद्रसिंहराजेंनीही आपल्या समर्थकांशी चर्चा करून त्यांची समजूत काढलेली नाही. त्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांनी आमदार सांगतील तरच उदयनराजेंच्या कार्यक्रम व प्रचारात सहभागी होण्याची भूमिका घेतली आहे. येत्या दोन-तीन दिवसांत उदयनराजेंकडून आमदारांशी चर्चा होण्याची शक्‍यता आहे. 

आता सात दिवसांवर होळीचा सण आहे. या सणापर्यंत दोन्ही राजे व त्यांच्या समर्थकांतील वाद मिटला तर त्या वादाची होळी होऊन जाईल. अन्यथा दोघांच्या समर्थकांमध्ये असलेली बदल्याची भावना कायम ठेवतच धुळवड होण्याची शक्‍यता आहे. या सर्व पार्श्‍वभूमीवर आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची भूमिका महत्त्वूपर्ण ठरणारी आहे. ते आपल्या समर्थकांची समजूत काढणार की उमेदवारी अर्ज दाखल होईपर्यंत ताणून धरणार, याकडे सर्वांचे लक्ष असेल. 

जुळणीचे गणित...
सातारा विधानसभा मतदारसंघात भाजप व शिवसेनेची ताकद असली तरी अद्याप त्यांच्या उमेदवारावर शिक्कामोर्तब झालेले नाही. भाजपतून सातारा लोकसभेसाठी नरेंद्र पाटील हे इच्छुक आहेत. तर शिवसेनेच्या कालच्या संभाव्य यादीत साताऱ्यातून पुरुषोत्तम जाधव आणि नरेंद्र पाटील यांच्यापैकी एकाच्या नावावर एकमत करण्याचे काम सुरू आहे. 

जावळीत उदयनराजे यांना मानणारे भाजपचे अमित कदम, राष्ट्रवादीचे नेते ऋषिकांत शिंदे, मेढ्याचे अपक्ष नगरसेवक दत्तात्रेय पवार, सयाजी शिंदे, शिवसेनेचे एस. एस. पार्टे, सदाशिव सपकाळ अशी मंडळी असली तरी ते उदयनराजेंचे काम करणार की पक्षाच्या उमेदवाराचे, हा प्रश्‍न आहे. तर आमदार शिवेंद्रसिंहराजेंकडे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे, सुहास गिरी आणि कुडाळ गटातील काही भाग वगळता उर्वरित सर्व गट आणि पंचायत समितीचे सदस्य आहेत. येथेही शिवेंद्रसिंहराजे सांगतील, त्याच पद्धतीने काम होणार आहे. त्यामुळे उदयनराजेंना साताऱ्यात लीड मिळविण्यासाठी शिवेंद्रसिंहराजेंशी जुळवून घेऊन त्यांच्या समर्थकांची समजूत काढावी लागणार आहे.

Web Title: Loksabha Election 2019 Udayanraje Bhosale Shivendrasinhraje Bhosale Politics