कोल्हापूर, सांगली, सातारा, हातकणंगले - युतीची मुसंडी; आघाडीला भोवले मतभेद

निखिल पंडितराव
Friday, 24 May 2019

काँग्रेस आघाडीच्या पश्‍चिम महाराष्ट्रातील वर्चस्वाला सुरुंग लावण्यात विरोधकांपेक्षा अंतःस्थ घटकांनीच हातभार लावला. युतीनेही प्रभावीरीत्या यंत्रणा राबवत विजयश्री खेचून आणली. परिणामी, सातारा वगळता इतरत्र युतीच प्रभावी ठरली.

काँग्रेस आघाडीच्या पश्‍चिम महाराष्ट्रातील वर्चस्वाला सुरुंग लावण्यात विरोधकांपेक्षा अंतःस्थ घटकांनीच हातभार लावला. युतीनेही प्रभावीरीत्या यंत्रणा राबवत विजयश्री खेचून आणली. परिणामी, सातारा वगळता इतरत्र युतीच प्रभावी ठरली.

कोल्हापूर मतदारसंघात खासदार धनंजय महाडिक यांनी गेल्या लोकसभा निवडणुकीनंतर घेतलेली सोयीची भूमिकाच या वेळी त्यांना नडल्याचे निकालावरून दिसते. पाच वर्षांत संसदेतील चांगले काम, सर्वाधिक प्रश्‍न विचारणारा अभ्यासू खासदार अशी ओळख आणि प्रलंबित प्रश्‍न सोडवण्याची धमक असूनही त्यांना या भूमिकेनेच लाजिरवाणा पराभव स्वीकारण्याची वेळ आणली. देशात नरेंद्र मोदी हवेत, ही तरुणांची मानसिकता, ‘आमचं ठरलंय’ म्हणत सतेज पाटील यांनी महाडिकांविरोधात उठवलेले रान, ‘महाडिक नको’ ही निर्माण झालेली मानसिकता, ‘गोकुळ’ मल्टिस्टेट प्रकरणात घेतलेला सहभागही नडला. महाडिकांच्या लोकांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांवर केलेले आरोप आणि पक्षातील सर्वांचा विरोध डावलून दिलेली उमेदवारी ही कारणेही महाडिक यांच्या पराभवाला कारणीभूत ठरली. प्रा. मंडलिक यांना त्यांच्या गटाची, पक्षाच्या, भाजपच्या ताकदीबरोबरच काँग्रेस व राष्ट्रवादीमधील नाराजींचीही साथ मिळाली. 

हातकणंगलेमध्ये साखर कारखानादारांविरोधात संघर्षाने शेतकऱ्यांचे हिरो ठरलेले राजू शेट्टींचा या वेळी करिष्मा चालला नाही. काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबरची आघाडी, इचलकरंजीच्या प्रश्‍नाकडे दुर्लक्ष, वस्त्रोद्योगाविषयीची अनास्था, मतदारसंघाकडील दुर्लक्ष यांबरोबरच जातीच्या फॅक्‍टरने शेट्टींच्या विजयाची हॅटट्रिक रोखली. धैर्यशील मानेंना लोकसभेत पाठवताना युवकांनी आणि मराठा समाजाने मोठ्या अपेक्षा ठेवल्यात. त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावर लढा देताना ऊस आणि दूध उत्पादकांचे प्रश्‍न गांभीर्याने मांडले. शेट्टींनी ऊसदर आंदोलनातून शेतकऱ्यांना न्याय देण्याचे काम केले. या वेळेच्या निवडणुकीत तुल्यबळ उमेदवार असणार नाही, या त्यांच्या समजानेही त्यांचा घात केला. 

सांगलीमधील कौल अपेक्षित होता. ऐनवेळी हा मतदारसंघच सोडून दिल्याने येथील काँग्रेसचे आव्हान संपले होते. स्वाभिमानीच्या संघातून विशाल पाटील ऐनवेळी बॅटिंगला उतरले. यात गोपीचंद पडळकरांनी वंचित आघाडीकडून अनपेक्षित फलंदाजी करणे भाजपच्या पथ्यावरच पडले. सांगली काँग्रेसचा बालेकिल्ला हा फक्त इतिहासच उरला. या वेळी भूखंडमाफियांपासून खासदार म्हणून पात्रता नाही, असे आरोप झेलत संजय पाटील यांनी दीड लाखाच्या मताधिक्‍याने वकूब दाखवून दिला. 

सातारा मतदारसंघात अपेक्षेप्रमाणे लाखावर मताधिक्‍य घेत ‘राष्ट्रवादी’चे उमेदवार उदयनराजे भोसलेंनी विजयाची हॅटट्रिक साधली. शिवसेनेचे नरेंद्र पाटील यांनी त्यांना चांगली लढत दिली. उदयनराजेंच्या उमेदवाराला आधी पक्षातूनच विरोध होता. मात्र, पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी तो मोडीत काढला. जागावाटपात शिवसेनेने आपल्याकडचा हा मतदारसंघ भाजपला नकारल्याने भाजपने त्यांचा उमेदवारच शिवसेनेला दिला आणि अखेरच्या क्षणी नरेंद्र पाटील शिवसेनेच्या चिन्हावर लढले. मात्र, ‘राष्ट्रवादी’च्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडण्याचे युतीचे मनसुबे धुळीला मिळाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loksabha Election Results Kolhapur Sangli Hatkanangale Satara Yuti Politics