Loksabha 2019 : अरुण जगताप आणि डॉ. विखेंच्या कात्रीत आमदार कर्डिले

मुरलीधर कराळे
बुधवार, 13 मार्च 2019

राष्ट्रवादीने जगताप यांच्या नावाची घोषणा केल्याने कर्डिले यांची मोठी अडचण झाली. विखे यांच्या विरोधात जगताप अशी काट्याची लढत होणार आहे. त्यात या मतदारसंघात कर्डिले यांची भूमिका महत्त्वाची असते.

लोकसभा 2019 
नगर : एकीकडे व्याही, तर दुसरीकडे राजकीय मदत करणारे मित्र. आता प्रचार कोणाचा करणार? अशा कात्रीत आमदार शिवाजी कर्डिले सापडले आहेत. राष्ट्रवादी काॅंग्रेसने नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघासाठी आमदार अरुण जगताप यांच्या नावाची घोषणा केली. कर्डिले जरी भाजपमध्ये असले, तरी व्याही जगताप यांना निवडून आणण्यासाठी त्यांना प्रयत्न करणे हे 'सोधो' (सोयरे-धायरे) ची जबाबदारी सांगते आणि राहुरी मतदारसंघातून विधानसभेसाठी मदत करणारे डाॅ. सुजय विखे यांना मदत करणे, भाजपचे काम करणे हा मित्रत्त्वाचा नियम सांगतो. त्यामुळे कर्डिले मदत कोणाला करणार, याकडेच जिल्ह्याचे लक्ष लागणार आहे.

डाॅ. सुजय विखे यांना भाजपमध्ये घेवून त्यांना उमेदवारी मिळवून देण्यात कर्डिले यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. विखे कुटुंबाशी त्यांची मैत्री सर्वश्रूत आहे. पक्ष वेगळा असला, तरी एकाच व्यासपीठावर अनेकदा त्यांनी एकमेकांना मदतीविषयी चर्चा केली. राहुरी विधानसभा मतदारसंघातून निवडून येण्यासाठी तनपुरे कुटुंबाशी सामना करताना विखे कुटुंबाची मदत झाल्याचे सर्वश्रूत आहे. तसेच तुम्ही भाजपात या, तुम्हाला खासदार करू, असे अनेकदा कर्डिले यांनी डाॅ. विखे यांना म्हटले आहे. आता खासदार करण्याची वेळ आल्याने आपला मित्र धर्म पाळण्याचे कर्डिले यांना चुकणार नाही.

दुसरीकडे राष्ट्रवादीने जगताप यांच्या नावाची घोषणा केल्याने कर्डिले यांची मोठी अडचण झाली. विखे यांच्या विरोधात जगताप अशी काट्याची लढत होणार आहे. त्यात या मतदारसंघात कर्डिले यांची भूमिका महत्त्वाची असते. त्यांचा आतून काैल कोणाला मिळणार, तोच खासदार होणार, हेही संपूर्ण जिल्हा जाणतो. त्यामुळे खासदार कोणाला करायचे, हे कर्डिलेच ठरविणार, अशीच काहीसे चित्र होऊ शकेल. या परिस्थितीत कर्डिले कोणाला काैल देतात, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागणार आहे. 

आमदार कर्डिले यांचा नगर शहरासह दक्षिणेतील तालुक्यांमध्ये चांगला संपर्क आहे. बहुतेक राजकीय निर्णय त्यांच्याच मार्गदर्शनाखाली होतात, असे राजकीय वर्तुळातून बोलले जाते. नगर शहराच्या राजकारणातही त्यांचाच निर्णय अंतीम असतो. एक हुशार, मुरब्बी, धुरंधर राजकारणी म्हणून त्यांची ओळख आहे. नगर तालुक्यातील अनेक गावे श्रीगोंदे विधानसभा मतदारसंघात असताना व या मतदारसंघाचे सदस्य नसतानाही त्या गावांतील मंडळी कर्डिले यांनाच आपले आमदार मानतात. अशा परिस्थितीत कर्डिले यांची भूमिका या लढतीत निर्णायक ठरेल, अशीच स्थिती आहे. त्यामुळे आता कर्डिले कोणाला `पावणार` हेच पाहणे उचित ठरेल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MLA kardile is stuck between the arun jagtap and sujay vikhe for loksabha election