Loksabha 2019 : राज्यात दोन अन्‌ केंद्रात एक कॅबिनेट मिळेल; रामदास आठवलेंना सरकारचे आश्‍वासन

तात्या लांडगे
रविवार, 12 मे 2019

  • रिपाइंच्या 40-50 कार्यकर्त्यांना विविध महामंडळांवर संधी देण्याचे आश्‍वासन
  • केंद्रीय राज्यमंत्री आठवले यांचा खुलासा 

लोकसभा 2019
सोलापूर: रिपाइंने लोकसभेसाठी तीन जागांची मागणी केली होती परंतु, मुख्यमंत्र्यांसह भाजप पक्षश्रेष्ठींनी आपल्याला राज्यात दोन आणि केंद्रात एक कॅबिनेट मंत्रीपदाची ऑफर दिली. तसेच रिपाइंच्या 40-50 कार्यकर्त्यांना विविध महामंडळांवर संधी देण्याचे आश्‍वासन दिल्यानेच आपण लोकसभेतून माघार घेतली, असा खुलासा केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी आज सोलापुरात केला. 

वंचित बहूजन आघाडीचा सर्वाधिक फायदा भाजप-शिवसेना-रिपाइं आघाडीलाच होईल. राज्यातील विधानसभा निवडणुकीत रिपांइला आठ ते दहा जागा द्याव्यात अशी मागणी भाजपकडे केली आहे. दरम्यान, सत्तेसाठी वंचित बहूजन आघाडीमध्ये गेलेले पदाधिकारी, कार्यकर्ते लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर रिपाइंमध्ये येतील, असा विश्‍वास आठवले यांनी यावेळी केला. दुष्काळी दौऱ्यानिमित्त आठवले सोलापुरात आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी तुमच्यावर खूप खुश आहेत. त्यामुळे राज्यात आता मंत्रिमंडळ विस्तार झाल्यास रिपांइला आणखी एक कॅबिनेट मंत्रीपद मिळेल आणि तसा शब्दही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला दिला आहे. 

आठवले म्हणाले... 
- दुष्काळ निवारणाच्या अनुभवासाठी आणखी पाच वर्षांची सत्ता हवी 
- कमळावर लढण्यास मी तयार नसल्यानेच लोकसभेची उमदेवारी नाकारली 
- राज्यात भाजप-शिवसेनेला 37 जागा मिळतील 
- वंचित बहूजन आघाडीची एकही जागा विजयी होणार नाही 
- भिमा-कोरगाव दंगलीचा ऍड. प्रकाश आंबेडकर घेताहेत राजकीय फायदा 
- बॅलेट पेपरवर निवडणूका घेण्यासाठी रिपाईंचा पाठिंबा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In State two and Center will get a one cabinet says ramdas athawale