सुशीलकुमारांचा आत्मविश्‍वास वाढला, कार्यकर्त्यांचे काय?

sushilkumar shinde
sushilkumar shinde

सोलापूर : गेल्या वर्षभरापासून मतदारांचा काँग्रेसकडे झुकलेला कल पाहता माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा लोकसभा निवडणुकीतील यशाबाबत आत्मविश्‍वास वाढला आहे. त्याचवेळी कार्यकर्त्यांत काही प्रमाणात असलेल्या उदासीनतेमुळे त्यांच्या आत्मविश्‍वासाला तडा जाण्याची शक्‍यता आहे. 

सोलापुरातील एका खासगी कार्यक्रमात माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी, मी आता सत्तेत नाही, मात्र लवकरच सत्तेत येणार आहे, असे वक्तव्य करून धमाल उडवून दिली. गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्या सुरू असलेल्या गाठीभेटी, त्याला मिळणारा प्रतिसाद आणि त्यांच्या उपस्थित होत असलेल्या कार्यक्रमांमुळे त्यांचा लोकसभा निवडणुकीतील यशाबद्दल आत्मविश्‍वास वाढला आहे. मात्र, कॉंग्रेस भवनातील जबाबदार पदाधिकाऱ्यांत अजूनही तितकी तत्परता दिसून येत नाही. अभी दिल्ली बहुत दूर है... अशा थाटात ते वावरत आहेत. त्यामुळे या पदाधिकाऱ्यांना गती देण्याचे काम शिंदे यांना करावे लागणार आहे. 

सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसकडून शिंदे यांचे एकट्याचेच नाव आहे. त्यामुळे उमेदवारीवरून मतभेद होण्याची शक्‍यता नाही. त्यातच राष्ट्रवादी कॉंग्रेसबरोबर आघाडी झाली आणि ज्येष्ठ नेते शरद पवार हे माढ्यातून उभे राहिले तर ते शिंदे यांच्यासाठी दुग्धशर्करा योग असणार आहे. त्याचवेळी भाजपत उमेदवारीवरून सुरू असलेली स्पर्धा, गटबाजी, इच्छुक दावेदारांची संख्या पाहता त्याचा लाभ घेणे शिंदे यांना शक्‍य आहे. त्याचवेळी कॉंग्रेसच्या हक्काच्या मतांचे विभाजन वंचित बहुजन आघाडी, बसप, एमआयएम, रिपाइंत होणार नाही याची दक्षता त्यांना घ्यावी लागणार आहे.

सोलापूर लोकसभा मतदारसंघातील गाव न गाव पिंजून काढण्याचे नियोजन शिंदे यांनी केले आहे. त्याचवेळी सहकारी पक्ष राष्ट्रवादीतील वजनदार नेत्यांचा संपर्कही त्यांनी वाढविला आहे. कॉंग्रेस भवनात नेहमीच्याच लोकांची गाऱ्हाणे एकण्याऐवजी सर्वसामान्यांचे म्हणणे एकण्याच्या त्यांच्या भूमिकेचे स्वागत होत आहे. निवडणुकीच्या कालावधीतही आम्हाला अशाच पद्धतीने विश्‍वासात घेऊन जबाबदारी दिली तर आम्ही रात्रंदिवस काम करण्यास तयार आहोत अशी, या कार्यकर्त्यांची भूमिका आहे. प्रस्थापितांकडून त्यांना कोणत्याही प्रकारची दुय्यम वागणूक मिळणार नाही याची दक्षताही शिंदे यांना घ्यावी लागणार आहे. 

...तो दिल्ली दूर नहीं 
भाजप खासदाराबाबत सध्याच्या विरोधी जनमताचा फायदा घेत योग्य नियोजन आणि सर्वांना घेऊन काम करण्याची तयारी ठेवली तर शिंदे यांना नक्की यश मिळू शकेल, अशी सद्यस्थिती आहे. अभी दिल्ली बहुत दूर है... हा कॉंग्रेस कार्यकर्त्यांतील भ्रम दूर केला आणि प्रचार यंत्रणा सक्षम राबविली तर अब तो दिल्ली दूर नही... असाच अनुभव येईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com