Loksabha 2019 : राष्ट्रवादीच्या आमदारांना मीच निवडून आणणार: उदयनराजे

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 15 मार्च 2019

मागील काळात झालेले मतभेद विसरून पुढे गेले पाहिजे, अन्यथा आपण यशस्वी होणार नाही. राष्ट्रवादीच्या जिल्ह्यातील आमदारांना मीच निवडून आणणार आहे. मी माझा शब्द खाली पडू देणार नाही, असे आश्‍वासन राष्ट्रवादीचे सातारा लोकसभा मतदारसंघातील उमेदवार उदयनराजे भोसले यांनी आज दिले. लोकसभेनंतर विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत, असा अप्रत्यक्ष इशाराही त्यांनी विद्यमान आमदारांना दिला. केंद्र शासनाच्या अन्यायकारक कायद्यांविषयक धोरणावरही त्यांनी टीका केली. 

सातारा : मागील काळात झालेले मतभेद विसरून पुढे गेले पाहिजे, अन्यथा आपण यशस्वी होणार नाही. राष्ट्रवादीच्या जिल्ह्यातील आमदारांना मीच निवडून आणणार आहे. मी माझा शब्द खाली पडू देणार नाही, असे आश्‍वासन राष्ट्रवादीचे सातारा लोकसभा मतदारसंघातील उमेदवार उदयनराजे भोसले यांनी आज दिले. लोकसभेनंतर विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत, असा अप्रत्यक्ष इशाराही त्यांनी विद्यमान आमदारांना दिला. केंद्र शासनाच्या अन्यायकारक कायद्यांविषयक धोरणावरही त्यांनी टीका केली. 

सातारा लोकसभा निवडणुकीसाठी सातारा तालुका व शहरातील उदयनराजे समर्थकांच्या बैठकीत ते बोलत होते. त्यावेळी बुधाजीराव मुळीक, भीमराव पाटील, नगराध्यक्षा माधवी कदम, सुहास राजेशिर्के, सुजाता राजेमहाडिक, स्मिता घोडके, सुहास राजेमहाडिक, सुनील काटकर, निशांत पाटील, विजय काळे, बाळासाहेब चव्हाण, नंदाभाऊ जाधव, शंकर माळवदे, किशोर शिंदे, रवी साळुंखे उपस्थित होते. उदयनराजे म्हणाले, ""प्रश्‍न जय-पराजयाचा नाही, तर तत्त्वाचा व या भागाच्या प्रगतीचा आहे. लोकशाहीत प्रत्येकाला उमेदवारी जाहीर करण्याचा अधिकार आहे. मला निवडून कशासाठी आणि का द्यायचे? जनतेच्या व जिल्ह्याच्या कल्याणासाठी काम केले, सर्वसामान्यांना केंद्रबिंदू मानून काम करत आहे. माझ्यापेक्षा जास्त हित जोपासून प्रगती करू शकणारा उमेदवार असेल तर मी त्या व्यक्तीचा प्रचार करण्यास तयार आहे.'' 

माझी दहशत आहे, असे सर्वजण बोलतात, पण का आणि कशासाठी, हे सांगताना उदयनराजे म्हणाले, ""डिमांड रिस्पेक्‍ट व कमांड रिस्पेक्‍ट हे दोन्ही माझ्याकडे आहेत. मी कोणालाही दिलेला शब्द खाली पडू देत नाही. "एक बार मैंने कमिटमेंट कर दी, तो मैं खुदकीभी नहीं सुनता...' आयुष्यात मी हेच कमविले आहे. तुम्ही सर्व जनता हीच माझी खरी संपत्ती आहे. संपूर्ण जिल्ह्याला गतवैभव प्राप्त करण्यासाठी आपल्या सर्वांची एकी आवश्‍यक आहे. एकता हीच आपली ताकद असून त्यातूनच आपल्याला आदर्श जिल्हा बनवायचा आहे.'' सध्याच्या सरकारने बनवलेल्या कायद्यांतून औद्योगिक क्षेत्रातील कारखाने बंद पडले, बेरोजगारी वाढली. बांधकाम व्यवसाय ठप्प झाल्याने कामगार बेकार झाले. शेतकऱ्यांची अवस्था पाहिली तर लाज वाटते. निवडणुकीपेक्षा तुमची उन्नती होणे, हे महत्त्वाचे असून देश प्रगतिपथावर नेण्यासाठी अन्यायकारक कायदे बदलले पाहिजेत. त्यासाठी देशात सत्तांतर करण्याशिवाय गत्यंतर नाही, असे स्पष्ट करत उदयनराजेंनी केंद्राच्या धोरणावर टीका केली.

बुधाजीराव मुळीक म्हणाले, ""माझा कोणत्याही पक्षाशी संबंध नाही. माझा संबंध फक्त उदयनराजेंशी आहे. उदयनराजे ही व्यक्ती नसून संस्था आहे. त्यामुळे त्यांना साताऱ्यापुरते मर्यादित ठेऊ नका. शिवरायांचे वंशज म्हणून त्यांना लोकसभेवर बिनविरोध निवडून द्या. त्यांना विरोध म्हणजे शिवरायांना विरोध होय. आज जर ते महाराष्ट्रभर फिरले तरी सगळे पक्ष हालतील. म्हणूनच त्यांनी कधी तरी महाराष्ट्र पिंजून काढावा.'' माजी नगराध्यक्षा रंजना रावत भाषणासाठी जात असताना नगरसेवक निशांत पाटील यांच्यासमोर असलेली पाण्याची बाटली त्यांच्या पायामुळे खाली पडली. त्यावर सर्वजण हसले. हाच धागा पकडून रंजना रावत यांनी भाषणाची सुरवात महाराजसाहेब बाटली आडवीच राहिली पाहिजे, असे म्हणताच उपस्थितांत हशा पिकला.

साताऱ्याऐवजी कऱ्हाड, पाटणमध्ये लक्ष द्या. विरोधकांना उमेदवार मिळालेला नाही, त्यामुळे एकतर्फी निवडणूक असली तरी गाफील राहू नका, असा सल्ला समर्थकांनी दिला. यावेळी समृद्धी जाधव, दत्तात्रय बनकर, अर्चना देशमुख, संदीप शिंदे, गीतांजली कदम, श्रीकांत आंबेकर, आर. वाय. जाधव, रंजना रावत, प्रल्हाद चव्हाण, माधवी कदम यांची भाषणे झाली. बाळासाहेब गोसावी यांनी सूत्रसंचालन केले.

खरोखरचा वाघ आणू नका; अन्यथा! 
आता या सभेच्या ठिकाणी वाघ आला तर आपण सर्वजण पळून जाऊ पण एकटे उदयनराजे न घाबरता येथे थांबतील, असा संदर्भ बुधाजीराव मुळीक यांनी आपल्या भाषणात जोडला होता. तोच धागा पकडून उदयनराजे म्हणाले, ""मुळीकसाहेब म्हणतात म्हणून खरोखर वाघ आणू नका, नाही तर ही निवडणूक माझ्या समोरच्यांसाठी बिनविरोध होईल. तुम्ही माझ्यासाठी न्यूटन, पास्कल, आर्किमिडीज आहात. मी तुमचा हितचिंतक आहे. पण, मी रास्कल नाही, असे त्यांनी म्हणताच उपस्थितांनी टाळ्यांनी दाद दिली. 

Web Title: Udayan Raje Bhosle statement about NCP MLA seats In Satara